बीड: जिल्ह्यातील पुस, ता.अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी बेकादेशीररित्या जमीन खरेदी केल्याचे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला आहे. यावरून उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान कोर्टांच्या आदेशानंतर आज चौथ्या दिवशी सकाळी ७ वाजता धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार राजाभाऊ फड हे गुरुवारी रात्रभर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.