न्यायालयाने परवेजला विचारले प्रश्‍न

0

जळगाव । सिमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सरकारपक्षातर्फे अक्सा मशीदीचे तत्कालीन सचिव शेख फारूख शेख अब्दुल्ला यांनी दिलेल्या साक्ष पुराव्याच्या आधारावर प्रश्न विचारण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी संशयीताला तीन प्रश्न विचारले. त्या तिनही प्रश्नांचे नकारार्थीच उत्तर दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरूवारी होणार आहे.

सिमी खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी न्यायाधीश पटणी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यात संशयीत परवेज खान रियाजोद्दीन खान याला अक्सा मशीदीचे तत्कालीन सचिव फारूख शेख यांनी दिलेल्या साक्षीच्या पुराव्यावरून प्रश्न विचारण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश पटणी यांनी तो अर्ज मंजूर करून बुधवारी परवेज खान याला तीन प्रश्न विचारले.

फारूख शेख अक्सा मशीदीचे तत्कालीन सचिव होते हे माहीत आहे काय? असे न्यायालयाने विचारले असता परवेज याने माहीत नाही असे सांगितले. तर अक्सा मशीदीत सिमीची बैठक घेण्यासाठी सिमीच्या लेटरहेडवर उर्दूभाषेत पत्र दिले होते. त्यात सिमीचा सचिव म्हणून तुम्ही परवानगी मागितली होती काय? असा प्रश्‍नही ही न्यायालयाने विचारल्यानंतर परवेजने नाही असे उत्तर दिले. तसेच या बद्दल तुम्हाला काही सांगायचे आहे काय? असा प्रश्‍न न्यायालयाने विचारल्यानंतर परवेज याने होय, या संदर्भात मी, लेखी देणार आहे असे न्यायालयाला सांगितले.

कार चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव- देवेंद्रनगरातील साईदास मोरसिंग राठोड यांची कार (क्र. एमएच-19, बीयू, 8481) 12 जुलै 2016 रोजी रात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात बुलडाणा जिल्ह्यातील तिसर्‍या संशयीताला 24 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी दुसर्‍या कारचोरीच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यासाठी न्यायाधीश कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला. पोलिसांची मागणी मंजूर करीत संशयीत हर्षल गंगतीरे याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

कार चोरीतील संशयिताला 24 रोजी केली होती अटक
देवेंद्रनगरातील साईदास मोरसिंग राठोड यांची कार चोरी प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी शेख दाऊद शेख मंजूर (वय 53, रा. धाडकर्डी, ता. जि. बुलडाणा), हर्षल मधुकर मंडळकर (वय 27, रा. जिजाऊनगर, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या प्रकरणातील तिसरा संशयीत हर्षद भगवान गंगतीरे (वय 26, रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) याला 24 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्याला न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी दुसर्‍या कारचोरीच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यासाठी न्यायाधीश कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला. पोलिसांची मागणी मंजूर करीत संशयीत हर्षल गंगतीरे याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.

दोघांचे अटकपूर्व फेटाळले
जळगाव- खोट्या जमीन मालकाला उभे करून चाळीसगाव येथील जमीन विक्री करणार्‍या तिघांवर चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात 9 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयितानी न्या. चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेले अर्ज बुधवारी फेटाळले आहेत. चाळीगाव येथील सुधाकर चुडामण मोरे यांच्या मालकीची जमीन 2 मार्च 2016 रोजी बनावट मालक उभा करून विक्री केल्या प्रकरणी चाळीसगाव येथील दुय्यम निबंधक रामदास साहेबराव पाटील यांनी लक्ष्मण पूनम रॉय, हरीक रामसिंग संघा, गौतम ईश्वर जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी लक्ष्मण रॉय आणि हरीक संघा यांनी न्या. चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेले होते ते आज फेटाळले.