मुंबई । मुंबईच्या कफ परेड या समुद्र किनार्याचे न्यूयॉर्क सेंट्रल पार्क प्रमाणे सुशोभित करण्याचा विचार मुंबई महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्यासाठी सर्वेक्षणकरता महापालिका नॅशनल इन्व्हारमेंटल इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्युट आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑशिएनाग्राफी या दोन स्वयंसेवी संस्थांची नियुक्त करणार आहे. या संस्था याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून महापालिकेसमोर अहवाल सादर करणार आहेत. महापालिकेच्या नियोजनानुसार कफ परेड येथील समुद्रकिनार्यावर 300 एकर पर्यंत समुद्रावर भराव टाकून त्यावर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. 2034च्या विकास आराखड्यानुसार भराव टाकलेला भाग पुढे न्यु यॉर्क सेंट्रल पार्कप्रमाणे विकसित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑशिएनाग्राफी ही संस्था समुद्राच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणार आहे. हा भराव टाकल्यास त्याचा भरतीच्या वेळी काय परिणाम होऊ शकतो, त्याने समुद्री जीवनावर कोणता परिणाम होऊ शकतो, या दिशेने अभ्यास करणार आहे, तर नॅशनल इन्व्हारमेंटल इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्युट ही संस्था भराव टाकल्यानंतर त्या भूभागाच्या दर्जाबद्दलचा अभ्यास करणार आहे. यामध्ये या भागाच्या सुशोभिकरणाचाही आराखडा अंतर्भूत असणार आहे, या भराव टाकलेल्या भूभागावर वनस्पतीजीवन कसे असेल, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
मेट्रो 3 प्रकल्पातील भरावाचा वापर करणार
या भागावर भराव टाकण्यापूर्वी भविष्यात होणार्या वाहतुकीचे, पादचार्यांचे नियोजन कसे करावे, तसेच मासेमारांसाठी बोटी उभ्या करण्यासाठी पर्यायी जागा कुठे असणार इत्यादी मुद्यांचाही सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी किती बांधकामे उभारण्यात येऊ शकतात, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. मेट्रो 3 च्या खोदकामातून उपलब्ध झालेला मातीचा भराव या रिक्लेमेशनसाठी वापरण्यात येणार आहे.