न्हावा गावातील चिटफंड घोटाळा झाल्याचे उघड

0

उरण । न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हददीतील न्हावा गाव आणि परिसरातील नागरिकांना वार्षिक सुमारे अठरा टक्के व्याजाचे आमिष दाखवून प्रत्यक्षात अनेकांना गंडवणार्‍या एका ठगाला न्हावा शेवा पोलिसांनी गजाआड केले आहे. महेश पाटील नामक या ठगाने न्हावा गाव परिसरात महालक्ष्मी क्रिएशन्स नामक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून 72 लाख रुपये जमा केले होते. दोन हजार तेरा ते चौदा सालापासून हे पैसे गोळा करताना महेश पाटील यांनी महिन्याला दीड टक्का याप्रमाणे वार्षिक अठरा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. भूलथापांना बळी पडून गावातील आणि परिसरातील सुमारे 19 ते 21 लोकांनी महेश पाटील यांच्याकडे गुंतवणूक केली होती. त्या गुंतवणुकीच्या बदल्यात अनेकांना त्याने रिटर्नचे चेकदेखील दिले होते. मात्र, बहुतेकांना संपर्क करून तो चेक बँकेत जमा करू नका थोडे दिवस थांबा, असे विनवत होता यावर विश्‍वास ठेवून अनेकांनी चेक बँकेत भरलेच नाहीत. मात्र, सातत्याने असेच होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील सुमारे 19 जणांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार महेश पाटील याला काल गुरुवारी अटक केली असून, त्याला आज अलिबाग जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता 19 एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय प्रमोद पवार यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिली.

तुम्हाला वार्षिक 18 टक्के व्याज देतो
राज्यात मोतेमवारसह अनेकांचे चिट फंड घोटाळे यापूर्वी झाले आहेत त्यापैकी अनेकांची प्रकरणे आजही विविध न्यायालयांत सुरू आहेत. विविध प्रकारच्या कंपन्यांनीदेखील यापूर्वीपासून अनेकांना गंडवले असल्याचे समोर असतानाही सामान्य नागरिक मात्र जास्त व्याजदाराचे आमिष दिसले की मागचे सगळेच विसरत आहे. तसाच काहीसा प्रकार न्हावा गाव परिसरात घडला असून याच गावचा रहिवासी असलेल्या महेश पाटील नामक युवकाने नागरिकांना महालक्ष्मी क्रिएशन्स नामक आपल्या संस्थेत गुंतवणूक करा तुम्हाला वार्षिक 18 टक्के व्याज देतो, असे आमिष दाखवले होते. आपल्याच गावातला असल्याने आणि बोलण्यात अतिशय पटाईत असल्याने महेश पाटील याचा भूलथापांना अनेक नागरिक भुलले आहेत.

19 ते 21 नागरिक समोर येऊन तक्रार
त्यातूनच सुमारे 21 जणांनी आपली कोणत्या ना कोणत्या कारणाने जमविलेली लाखो रुपयांची रक्कम महेश पाटील यांच्याकडे गुंतवली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 19 ते 21 नागरिक समोर येऊन तक्रार केली असली, तरीही प्रत्यक्षात फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याचीदेखील भीती आहे. महेश पाटील यांच्याकडे पैसे भरणार्‍यांमध्ये सुमारे पाच लाखांपासून ते बारा ते पंधरा लाखांपर्यंतचे पैसे गुंतवले असलेले नागरिक असल्याचे समोर आले आहे. महालक्ष्मी क्रिएशन्सच्या या महेश पाटीलच्या फसवणुकीने फसलेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महेश पाटील याचे आणखी दोन साथीदार फरार असून तपासात व्यत्यय येईल म्हणून संबंधितांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला असून संबंधितांना अटक केल्यानंतर त्यांची ही नावे कळवली जातील असे तपास अधिकारी पवार यांनी सांगितले. यासंबंधीचा पुढील तपास न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या सल्ल्यानुसार एपीआय प्रमोद पवार करत आहेत.