पोलिसांकडून कारणांचा शोध सुरू : प्रेम प्रकरणातून घटना घडल्याचा संशय
निंभोरा- शेत शिवारात गट नं.842 शेताच्या विहिरीत एक अनोळखी पुरूष जातीच्या व 21 वर्षीय ईसमाचा 13 रोजी दुपारी 1.10 वाजेपूर्वी मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या तपासात हा मृतदेह न्हावी (ता.यावल) येथील पवन रायसिंग बारेला (22) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा संशय आहे. निंभोरा पोलिसांकडून घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू असून सायंकाळपर्यंत या प्रकरणाचा गुंता उलगडेल, अशी शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांनी वर्तवली.
खून करून मृतदेह फेकला ?
शेतमजुरीचे काम करणार्या पवन बारेलाने मध्यप्रदेशातील आपल्या गावातील एका तरुणीला पळवून आणले होते तर उभय लग्नदेखील करणार होते मात्र मुलीच्या पाल्यांनी दोन वेळा तिला परत गावी नेले होते. तिसर्यांदा देखील तरुणीला पळवून आणल्यानंतर उभय लग्नाच्या प्रयत्नात असताना पुन्हा मुलीकडच्या लोकांनी निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ पवन बारेलाला गाठल्याही माहिती आहे तर या घटनेनंतर 28 जूनपासून तो बेपत्ता झाल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यास शिर (डोके) नसल्याचे आढळल्याने हा हत्येचा प्रकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. निंभोरा पोलीस ठाण्यात पंकज कमलाकर चौधरी (निंभोरा) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असून शनिवारी सायंकाळपर्यंत या घटनेचा उलगडा होईल, असे सहा.निरीक्षक वानखडे म्हणाले.