जळगाव – न्हावी (फैजपुर) येथे एका शेतात काम करणाऱ्या ५० वर्षीय सालदाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी फैजपुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरसिंग रशा बारेला (मुळ रा.सतापिंप्री, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे मृत सालदाराचे नाव आहे. बारेला कुटुंबिय काही वर्षांपासून न्हावी येथे रहिवासाला आहे. पिंटु थिरके यांच्याकडे सालदारकी करुन त्यांच्याच शेतात ते राहतात. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून सुरसिंग यांचा मृतदेह त्यांच्याच घरात पडून होता. इतर शेतात कामाला गेलेले त्यांचे कुटुंबिय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, सुरसिंग यांच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण होते. मारहाण केल्यानंतर पाण्यात डोके बूडवुन त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. फैजपुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक आधार निकुंभे, हेमंत सांगळे, किरण चाटे व उमेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. रात्री उशिरा सुरसिंग यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला होता. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणीच्या वेळी अंगावरील व्रण असल्यामुळे त्यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले. त्यामुळे त्यांचा मृतदेह शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला होता. दरम्यान, या प्रकरणी फैजपुर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउनि निकुंभे तपास करीत आहेत. सुरसिंग यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून न्हावी परिसरातील दोन जण बेपत्ता झाले आहेत. हे दोघे सुरसिंग यांच्याच समाजातील अाहेत. सर्वजण एकमेकांना ओळखत होते. काही कारणामुळे वाद होऊन या दोघांनीच सुरसिंग यांचा खुन केला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, दोघे जण बेपत्ता असल्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे सरकली आहे.