न.पा.कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

0

नंदुरबार:नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भात आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबीर हा रोटरी क्लब नंदनगरीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऍड. राम रघुवंशी यांनी व्यक्त केले. ते रोटरी क्लब नंदनगरी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

रोटरी क्लब नंदनगरीने नगर परिषदेचे कर्मचारी व सेवा फाउंडेशनचे सफाई कर्मचारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नगरपरिषदेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, नंदनगरी रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, प्रितम ढंढोरे, भारत भूषण, अभियंता विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

आरोग्य तपासणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील पहिलेच नियोजित स्मित मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे नियमित सेवा देणारे डॉ. गौरव तांबोळी (जसलोक हॉस्पिटल मुंबई) व डॉ. स्वप्नील महाजन (एम.जी.एम. रुग्णालय औरंगाबाद) उपस्थित होते. नगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांनी नंदुरबार शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्स म्हणून काम करीत आहेत. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आरोग्य तपासणी सोबतच कर्मचाऱ्यांना रोटरी नंदनगरीतर्फे सॅनिटायझर, मास्क व ग्लोज यांचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब नंदनगरीतर्फे आत्तापर्यंत विविध शासकीय कार्यालयांमध्ये सॅनिटायझर स्टँड तसेच अन्नदान, विविध गरजू साहित्याचे वाटप, ग्लोज, मास्क यांचे शहरात वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे काम केले गेले.

यशस्वीतेसाठी रोटरी क्लब नंदनगरीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले.