पंकजांना आता शिवसेनेची आव्हान!

0

मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात पक्षाचा उमेदवार उभा करायचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच ‘मातोश्री’वरून स्थानिक नेत्यांना चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी परळी आणि आष्टी परिसराचा दौराही केला आहे. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार न देणाचा निर्णय शिवसेनेने घेतला होता.

.. त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही
परळी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा संदेश देत तयारीला लागावे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणीही निवडणूक लढवावी, मी त्यासाठी सज्ज आहे. जो कोणी असेल त्याला निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा येत नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते.