पंचगंगा, शिवशक्तीने जिंकला शेलारमामा चषक, नितीन, पूजा स्पर्धेत सर्वोत्तम

0

मुंबई । शेलारमामा फाउंडेशनने जय भारत सेवा संघाच्या सहकार्याने श्रमिक जिमखाना येथे आयोजित केलेल्या स्पर्धेतील द्वितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात पंचगंगा संघाने ओम् श्री साईनाथ संघाचे आव्हान 25-18 असे परतवून लावत रोख सात हजार रुपये व शेलारमामा चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या साईनाथ संघाला रोख पाच हजार रुपये आणि चषकावर समाधान मानावे लागले. सुरुवातीपासून सावध खेळ करीत पंचगंगा संघाने मध्यांतराला 12-09 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ती थोडी वाढवित शेवटी सात गुणांनी सामना जिंकला. नितीन सावंत, राज ठुकरूल, रवींद्र सावंत यांच्या कल्पक खेळाला याचे श्रेय जाते. साईनाथच्या विनायक नायडू, सर्वेश लाड, सिद्धेश राऊत यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी पडला.

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती संघाने मुंबई पोलीस संघाचा प्रतिकार 27-23 असा मोडून काढत रोख पाच हजार रुपयांचा पुरस्कार व शेलारमामा चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या पोलिसांना रोख तीन हजार आणि चषक देत्तन गौरवण्यात आले. मध्यांतराला 14-10 अशी आघाडी घेणार्‍या शिवशक्तीला उत्तरार्धात कडव्या प्रतिकाराला सामोरी जावे लागले. विश्रांतीनंतर पोलिसांच्या शीतल शिंदे, भक्ती इंदूलकर, सिद्धी वाफेकर यांनी आपला गिअर बदलत सामन्यात रंगत आणली. पण मध्यांतरातील आघाडी काय त्यांना भरून काढणे जमले नाही, म्हणूनच त्यांचा पराभव झाला. शिवशक्तीच्या या विजयात पूजा यादव, तेजस्विनी चौगुले, साक्षी रहाटे यांचा खेळ महत्त्वपूर्ण ठरला. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात पंचगंगा संघाने भवानीमाता संघाचा 31-21 असा तर ओम् श्री साईनाथ संघाने साईके दिवाने संघाचा 30-25 असा पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महिला गटात शिवशक्ती संघाने डॉ. शिरोडकर संघाचा 41-25 असा, तर मुंबई पोलिसांनी अमरहिंद मंडळाचा 23-22असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. पंचगंगा संघाच्या रवींद्र सावंतला उत्कृष्ट चढाईचा,तर ओम् श्री साईनाथ संघाच्या सर्वेश लाड उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. लक्षवेधी खेळाडू ठरला तो ओम् श्री साईनाथ संघाचा सिद्धेश राऊत. महिलांत लक्षवेधी खेळाडू ठरली ती पोलीसांची आरती यादव. शिवशक्तीची साक्षी रहाटे उत्कृष्ट पकडीची, तर पोलीसची सिद्धी वाफेकर उत्कृष्ट चढाईची खेळाडू ठरल्या. या स्पर्धेचे बक्षिस वितरण नाट्य-सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव, सुशांत शेलार (आयोजक),नगरसेवक आशिष चेंबूरकर, निरंजन नलावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.