पिंपरी-चिंचवड : कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुरात रेडे डोह येथे पाण्यात कार बुडाल्याची घटना शनिवार रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत निगडीतील दोन जण सुखरूप बचावले. मदत पथक आणि पोलिसांनी दोन तास राबविलेल्या मोहिमेनंतर कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात कार बुडत असताना गाडीतील दोघे प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे दुर्घटना टळली. सुरेंद्र गुरुराज राव आणि विजय सरवदे (दोघे रा. निगडी) असे या अपघातात बचावलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत.
पाण्याचा प्रवाह जास्त
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र राव आणि विजय सरवदे हे दोघे बी.एम.डब्ल्यू (एमच 14 सीके 9159) क्रमांकाच्या कारमधून पन्हाळ्याकडून कोल्हापूरकडे येत होते. या मार्गावरील आंबेवाडीनजीक असलेल्या रेडे डोह येथे मार्ग बंद केला असल्याने कार चालकाने पुन्हा पन्हाळ्याकडे कार वळवली. परंतु रेडे डोह येथे कार पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्यात गेली. प्रसंगावधान ओळखून दोघांनी कारचे दरवाजे उघडून गाडीतून बाहेर पडले. परंतु कार पाण्यात वाहून गेली. घडलेली घटना त्यांनी काही अंतरावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना जाऊन सांगितली. पोलिसांनी या घटनेची माहिती आपत्ती निवारण कक्षास दिली.
दोनवेळा तुटला दोर
आपत्ती निवारण कक्षातून फायबर बोट, ट्रॅक्टर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कार पाण्यात बुडाल्याची माहिती गावात पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. आपत्ती निवारण पथकाने प्रकाशझोतात कारचा शोध घेऊन कार पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरला दोर बांधून कार पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार पाण्यात रुतल्याने आणि दोन ते तीन वेळा दोर तुटल्याने कार पाण्यात बाहेर काढण्यास पथकाला दोन तास लागले.