पंचनाम्यांसाठी कृषी सहाय्यकांच्या रिक्त जागांचा अडसर !

0

नाशिक, नगरची सर्व पदे भरली : जळगावला 156 पदे रिक्त

जळगाव: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सर्वच शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणांना आठ दिवस मुदत देण्यात आली आहे. मात्र यंत्रणेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी सहाय्यकांच्या तब्बल दिडशेहून अधिक जागा रिक्त असल्याने पंचनामे करण्यात मोठी अडचण येत आहे. ही पदे भरण्यात शासनाकडुनच उदासिनता असल्याचे काल एका बैठकीच्या निमीत्ताने उघड झाले आहे. जिल्ह्यात यंदा दिवाळीनंतरही पावसाचा मुक्काम कायम राहीला आहे. सर्व 15 तालुक्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला आहे. जिल्ह्यात सहा लाख हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तब्बल 5 शेतकरी 5 हजार 788 शेतकरी या अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थीती असुन मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना पंचनाम्याचे आदेश दिले. तसेच पालकमंत्र्यांनाही आढावा घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी काल यंत्रणांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. शासनस्तरावरून रिक्त पदेच भरली जात नसल्याचे उघड झाले आहे.

कृषी विभागात रिक्त पदांचा बॅकलॉग

पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक अशा तीन जणांचे संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. यात सर्वात महत्वाचा घटक असलेल्या कृषी सहाय्यकाची जिल्ह्यात 495 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 156 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तालुका कृषी अधिकार्‍यांची सहा, मंडळ कृषी अधिकार्‍यांची 39 तर आत्मा विभागातील तीन पदे रिक्त आहेत. कृषी विभागात रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग दिसून येत आहे. पंचनामे आणि इतर शासकीय कामे करण्यासाठी ही यंत्रणा तोकडीच पडत आहे.

पाच वर्षात शासनस्तरावरून उदासिनता

गेल्या पाच वर्षात कृषी विभागाकडुन ही पदे भरण्यासंदर्भात शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विभागातील नाशिक, अहमदनगर येथील सर्व पदे भरण्यात आली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चक्क जिल्हाधिकार्‍यांनीही कृषी आयुक्त, सचिव यांना पत्र पाठविली आहे. तरी देखिल शासनस्तरावरून पदे भरण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या हालचाली होतांना दिसून येत नाही. पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात तालुका कृषी अधिकार्‍यासह मंडळ कृषी अधिकार्‍याची पदे रिक्त असतांना ती देखिल पाच वर्षात भरली गेली नाही. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी रिक्त पदे मोठा अडसर ठरत आहे.

जिल्ह्यात कृषी विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जात नसल्याने कमी कर्मचारी व अधिकार्‍यांवर अतिरीक्त कामाचा ताण पडत आहे. शासनाकडे पाठपुरावा करूनही परिस्थीती जैसे थेच आहे. त्यामुळे कामांना देखिल विलंब होतो. ही पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
संभाजी ठाकुर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव