पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांचे (वार्डचे) आरक्षण जाहिर

0

शिंदखेडा। शिंदखेडा नगर पंचायतीच्या दुसर्‍या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांचे (वार्डचे) आरक्षण जाहिर करण्यात आले. शिरपूरचे उपविभागीय अधिकारी व पीठासीन अधिकारी नितीन गावंडे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरपंचायतिच्या 17 वार्डचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येथील नगरपंचायतीच्या वाचनालय हॉल मध्ये विशेष सभा घेण्यात आली . पीठासीन अधिकारी नितीन गावंडे यांनी वार्ड क्रमांकांच्या 17 चिठ्या टाकल्या त्यातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले .यात वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 3 हे अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आले. यातील वार्ड क्रमांक 3 हा महिलांसाठी राखीव आहे .यानंतर अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली . वार्ड क्रमांक 2,5 व 17 अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले. महिला प्रवर्गासाठी चिठ्ठी काढण्यात आली यात वार्ड 5 व 17 अनुसूचित जमातीसाठी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. अनुसूचित जाती व जमातीच्या वॉर्डाचे आरक्षण या जाती -जमातीच्या लोकसंख्येचा आधार घेवून निश्चित करण्यात आले आहेत.

मागास प्रवर्गासाठी 5 जागा
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 5 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यासाठी उर्वरित 12 वार्डाच्या चिठ्या टाकण्यात आल्या यातून वार्ड क्रमांक 4,11,12,13 व 16 हे आरक्षित करण्यात आले. यांपैकी 4,12 व 13 हे वार्ड मागास प्रवर्गातील महिलांनासाठी राखीव आहे.जनरल (सर्वसाधारण) जागेसाठी 6,7,8,9,10,14 व 15 हे वार्ड आरक्षित आहेत . यापैकी 10,14 व 15 हे वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. आरक्षणाच्या चिठ्या अनिकेत प्रमोद नेरपगार या मुलाच्या हाताने काढण्यात आल्या. सुमारे एका तासात हा आरक्षण सोडत कार्यक्रम चालला .मुख्याधिकारी अजित निकत ईश्वर सोनवणे, सचिन पाटील, कांबळे यांनी सहकार्य केले.यावेळी गटनेते अनिल वानखेडे,सभागृह नेते दिपक देसले,उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, नगरसेवक,विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते