पंचायत समिती सभापती ठरणार ईश्वर चिठ्ठीने

0

चाळीसगाव (सुर्यकांत कदम) । तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणांचे निकाल लागले असून यात मागील पंचवार्षिकच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला गणात वाढ करता आली नाही. मात्र गटामध्ये त्यांचा एक उमेदवार वाढला आहे. तर भाजपला गणामध्ये 2 ने वाढ होऊन त्यांच्या 7 जागा झाल्या असून गटामध्ये मात्र 1 जागा घटली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आमदार उन्मेश पाटील व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारात जोर लावला असला तरी भाजपला हे निकाल विचार करायला लावणारे आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता नसतांना देखील चांगले बहुमत मिळाल्याने त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसत आहे. जि.प. व पं.स.ची निवडणूक चाळीसगाव तालुक्यात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलीच गाजली होती. जिल्ह्याचे लक्ष चाळीसगाव तालुक्यावर होते. विधान सभेची निवडणूक झाल्यानंतर आमदार उन्मेश पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत यश संपादन केल्याने भाजपचे पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता म्हणून भाजपने खास करून आमदार उन्मेश पाटील यांनी जे निर्णय घेतले त्यात भाजपला यश आल्याने देशात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर तालुक्यात आमदार उन्मेश पाटील असे समिकरण तालुक्याचे झाले होते. आमदार उन्मेश पाटील यांचा निर्णय हा भाजपच्या फायद्याचा ठरल्याने कधी नव्हे एवढे मोठे यश भाजपला या दोन वर्षात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणूका, विकासो, निवडणुका, त्यापाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती व 45 वर्षाची एकहाती सत्ता मोडीत काढत नगरपालिकेवर देखील आमदारांच्या नेतृत्वात भाजपाला यश मिळाले. नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदारांनी नव्या पध्दतीने तिकीट वाटप करून आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या या रणनितीमुळे भाजपाचे तब्बल 13 नगरसेवक निवडून आलेत तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील निवडून आल्याने चाळीसगावकरांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे दिसून आले व नगरपालिकेवर अपक्ष आणि सेनेच्या मदतीने यश मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील मोठे यश प्राप्त होईल, यासाठी नियोजनबध्द पध्दतीने गट आणि गणामध्ये उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आले. याठिकाणी जुने जानकार व पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना डावलून नवख्यांना संधी देण्यात आली.

गटबाजीने मिळाला राष्ट्रवादीला फायदा
मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले विद्यमान जि.प. व प.स. सदस्यांना देखील या निवडणूकीत तिकीट डावलल्याने भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते. याच नाराजीचा फटका या निवडणुकीत भाजपला बसला मात्र याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे. राष्ट्रवादी काँंग्रेसला गणामध्ये 7 चा आकडा पार करता आला नसला तरी गटामध्ये मात्र 1 जागा निवडून आणण्यात माजी आमदार राजीवदादा देशमुख यांना यश मिळाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वतीने जुने एकनिष्ठ पदाधिकारी व विद्यमान सदस्यांना तिकीट नाकारल्याने भाजपामध्ये 2 गट तयार झाल्याने या निवडणुकीत भाजपला काही ठिकाणी पराभवाला समोरे जावे लागले आहे. रांजणगाव – पिंपरखेड गटात मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आला होता. आत्ता मात्र तो गट राष्ट्रवादीकडे गेला आहे. अशीच परिस्थिती तालुक्यात देखील बघावयास मिळाली. आमदार उन्मेश पाटील यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली.

भाजपाच्या गटबाजीने बसला फटका
या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये जागा वाढण्याचे बोलले जात होते. मात्र भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला आहे. त्यांनी तालुकाभरात केलेली विकास कामे व जोडलेली तरूण फळी या माध्यमातून आणि नियोजनबध्द प्रचार केल्याने पंचायत समितीवर भाजप चा झेंडा फडकणार अशा आशयाचे चित्र दिसत होते व तशी चर्चा देखील झाली होती. मात्र शहरातील जनतेने ज्या पध्दतीने नगरपालिकेत फिफ्टी-फिफ्टी पध्दतीने कौल दिला होता. त्यात 17 जागा आघाडीला व 13 भाजप आणि 2 अपक्ष 2 सेना मिळून 17 अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नगराध्यक्षांच्या मतामुळे नगरपालिकेवर भाजपाची सत्ता आली. तिच परिस्थिती चाळीसगाव पंचायत समितीवर आली आहे. 14 गणांमध्ये भाजप ला 7 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस ला 7 जागा मिळाल्याने आता सभापती कोण ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सभापती व उपसभापती निवडीच्या दिवशी ईश्वर चिट्टीनेच सभापती उपसभापती निवडले जाणार आहे. त्यामुळे जनता जर्नादनाने कौल दिल्याचे मान्य करावे लागेल. या निवडणूकीत शिवसेनेला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून मागील पंचवार्षिक निवडणूकीत शिवसेनेचा 1 उमेदवार गणामध्ये निवडून आल्या होता. त्यामुळे व भाजप कडे संख्याबळ कमी असल्याने आणि राष्ट्रवादीला बहुमतासाठी 1 सदस्यांची गरज असल्याने राष्ट्रवादीला पाठींबा देऊन पंचायत समितीवर पुर्ण 5 वर्ष पंचायत समितीवर उपसभापती होते. त्यावेळी शिवसेनेने जास्त उमेदवार दिले नव्हते मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर उमेदवार देऊन सुध्दा त्यांना एकहि उमेदवार निवडून आणता आला नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेने मागील निवडणूकीत खाते खोलेले होते मात्र यंदा त्यांना उमेदवार देखील देता आला नाही. तशीच काहीशी परिस्थिती तालुक्यात काँग्रेस ची आहे. काँग्रेसला देखील स्वबळावर एकहि उमेदवार निवडून आणता आला नाही.

भाजपाला प्रभाव पडण्यास
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही मिनी आमदारकी म्हणून ओळखली जाते या निवडणूकीत कोन कितने पानी मे याची चाचपणी होते त्यामुळे आमदारकी मध्ये कोणाला फायदा होतो. या ग्रामीण भागातील निवडणूकीत दिसून येते म्हणून विद्यमान आमदार व माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. या निवडणूकीत दोन्ही आजी – माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी राष्ट्रवादीला बर्‍यापैकी यश मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या असून आमदार उन्मेश पाटील यांनी केलेली विकास कामे, नियोजनबध्द प्रचार व मागील निवडणूकांमध्ये मिळालेले यश पाहता फारसा काही प्रभाव पाडता आला नाही.

गटबाजीमुळे भाजपला इतर ठिकाणी बसला फटका
पालिकानंतर आता पं.स.मध्येही भाजपाला यश
साकारात्मक निर्णयामुळे आमदारांचे वर्चस्व
तालुक्यात भाजपला 3 तर राष्ट्रवादी 4 गटात विजय
भाजप राष्ट्रवादी फिफ्टी – फिफ्टी; सेनेचा धुव्वा
दोन्ही पक्षांना सम सामान अश्या 7-7 जागा