पंजाबकडून गुजरातचा धुव्वा

0

राजकोट । हाशिम आमलाचे अर्धशतक, अक्षर पटेलने केलेली अष्टपैलू कामगिरी आणि त्याला इतरांडून लाभलेली सुरेख साथ याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये आज झालेल्या पहिल्या लढतीत गुजरात लायन्सवर 26 धावांनी मात केली. त्याबरोबरच सलग चार पराभवांची मालिका खंडित करत पंजाबने या हंगामातील सात सामन्यांमधील आपल्या तिसर्‍या विजयाची नोंद केली. तर गुजरातला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या लढतीत कोलकाता नाइटरायडर्सविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणार्‍या गुजरातला पंजाबने दिलेले 189 धावांचे आव्हान पेलवले नाही. ब्रँडन मॅक्युलम (6), आरोन फिंच (13), अ‍ॅड्रयू टाय (22), सुरेश रैना (32) आणि बसील टंम्पी हा नाबाद (11) अशी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने गुजरात लायन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाठोपाठ रवींद्र जडेजा (9), ड्वेन स्मिथ (4) आणि अक्षदीप नाथ (0) हेही बाद झाल्याने गुजरातचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला.

घरचा मैदानावर 26 धावांनी पराभव
एकाकी झुंज देणार्‍या दिनेश कार्तिकने (नाबाद 58) अँड्र्यू टायसह (22) 35 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. अखेर गुजरातला घरच्या मैदानावर 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबकडून अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि करिअप्पा यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्ससमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. हाशिम आपलाने केलेली अर्धशतकी खेळी आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल व अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकात 7 बाद 188 धावा फटकावल्या. गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मनन व्होराच्या (2) रूपात पंजाबला पहिला धक्का बसला. मात्र आज सलग दुसर्‍या सामन्यात हाशिम आमलाने पंजाबसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. 40 चेंडूत 65 धावांची खेळी करणार्‍या आमलाने शॉन मार्शच्या (30) साथीने दुसर्‍या गड्यासाठी 70 धावांची आणि ग्लेन मॅक्सवेलसोबत (31) 47 धावांची भागीदारी केली. मात्र आमला आणि मॅक्सवेल पाठोपाठ बाद झाल्याने पंजाबचा डाव अडखळला. पाठोपाठ स्टोनियसही 7 धावा काढून बाद झाला. मात्र अक्षर पटेलने 17 चेंडूत 34 आणि वृद्धिमान साहाने 5 चेंडूत 10 धावा फटकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. गुजरातकडून अँड्रयू टायने दोन आणि रवींद्र जडेजा, ड्वेन स्मिथ, शुभम अग्रवाल आणि नाथू सिंग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

पंजाबची खेळी याप्रमाणे
गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मनन व्होराने सामन्याची सुरूवात करून अवघ्या दोन धावांवर कार्तिकला झेल देवून रणांगण सोडले. त्यानंतर हिसीन आमला (65) व शाहून मर्श (30) दोघांच्या 81 रणांची भागीदारी चांगली रंगत आणली होती. मात्र अँड्र्यू टायच्या षटकात शाहून मर्श बाद झाला. यात मनन व्होरा (2), हिसीन आमला (65), शाहून मर्श (30), ग्लेनन मॅक्सवेल (31), मार्कस स्टोनिस (7), अक्सर पटेल (34) आणि वृध्दीमन शाह (10) अशा धावांनी पंजाबने आपली 188 धावांची डोंगर उभा केला. गुजरात लायन्स संघाची यंदाच्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी होत असताना आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे आयपीएलला मुकावे लागणार आहे.