पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था संरक्षण योजनेचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
अमुल्य योजना राबविल्यास संस्थेवरील विश्‍वास वाढेल
पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन
लोणावळा : महाराष्ट्राला समृद्ध करायचा असेल तर महाराष्ट्रातील सहकाराला जोडधंदा जोडल्यास सहकारातूनच समृद्ध अशी सहकार चळवळ उभी राहील. बहुतांश पतसंस्था या संचालकांच्या नातेवाईक, हितसंबंधातील व्यक्तींना कर्ज दिल्यामुळे डबघाईला आल्या. काही नेस्तनाबूत झाल्या आहेत. सहकारी पतसंस्थांचा प्रगतीचा आलेख उंचावयाचा असेल, कर्ज देणे व वसुली संदर्भात कडक धोरण राबविले पाहिजे तरच त्या तरतील. कडक धोरण आणि ठेवीदारांना सवलती, नवीन अमूल्य योजना राबविल्यास ठेवीदारांचा पतसंस्थांवरील विश्‍वास वाढेल, असा विश्‍वास सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्यावतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांतील एक लाख रुपयांच्या ठेवींना संरक्षण देणारी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ पतसंस्था संरक्षण योजनेचा शुभारंभ लोणावळा येथे करण्यात आला. यावेळी काही पतसंस्थांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार बाळा भेगडे, सहकार आयुक्त सतीश सोनी, लोणावळा नगराध्यक्षा  सुरेखा जाधव, सहकार भारतीचे महामंत्री प्रा.उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, माजी आमदार दिलीप बनकर, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तूपकर, संचालक प्रकाश पोहरे, अ‍ॅड.अंजली पाटील, सीईओ सुरेखा लवांडे आदी उपस्थित होते.
पतसंस्थांनी गमविला विश्‍वास
सहकारमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, सर्वसामान्य समाजातील ठेवीदारांना व अडअडचणींना कर्जासाठी आधारवड असलेल्या सहकारी पतसंस्था या संस्थेच्या संचालकांनी नातेवाईकांना कर्जे दिल्यामुळे गोत्यात आल्या होत्या, व अजुनही येत आहेत. संचालकांच्या या नियमबाह्य धोरणांमुळे ठेवीदार व नागरिकांचा पतसंस्थावरील विश्‍वास उडाला आहे. संचालकांची मतलबी धोरणे ही सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे. यापूर्वी अनेक पतसंस्थेच्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांनी पतसंस्थेतेतून मोठ्या प्रमाणात कर्जे घेऊन ती आमच्या सरकार विरोधी विचारांच्या सहकारी बँकेत होत्या. त्या बँकाही त्यांच्या संचालकांच्या धोरणामुळे डबघाईला आल्या व बंद पडल्या आहेत. अशा डबघाईला व बंद पडलेल्या बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी काढून देण्यासाठी अनेकजण आमच्याकडे येत आहे.
विकासात पतसंस्थांचे योगदान
यावेळी चरेगांवकर म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात सहकार क्षेत्राविषयी समाजात अविश्‍वास निर्माण झाला. सहकार चळवळीला गत वैभव प्राप्त करून देणे हे आव्हान आहे. यासाठी संस्कारीत कार्यकर्ते घडविण्याची गरज आहे. आपण चिंतन करून सहकार क्षेत्रात काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सहकार आयुक्त सोनी म्हणाले की, राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँकांपेक्षा पतसंस्था तळागाळापर्यंत पोहचल्या. यामुळे सामान्य नागरिकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. महाराष्ट्राच्या विकासात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे.