नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का
तळेगाव- भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या पंढरीनाथ ढोरे यांनी बंडाचे निशाण फडकवले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीची स्थापना करीत वडगाव-कातवी नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत जाहीर केला. भाजपच्या 17 पैकी पाच उमेदवारही त्यावेळी उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेस भाजपच्या यादीतील उमेदवार दशरथ केंगले, दिनेश ढोरे, अश्विनी तुमकर, अश्विनी वहिले, रुक्मिणी गराडे तसेच सुनील चव्हाण, गंगाराम ढोरे, सुभाष जाधव, चंद्रकांत ढोरे, अरुण निकम, बाळासाहेब दौंडे, बारकू ढोरे, सुरेश कुडे, बाळासाहेब झरेकर, नंदकुमार चव्हाण, पोपटराव वहिले, चंद्रकांत राऊत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास दंडेल, बंडोपंत निकम, रामभाऊ ढोरे, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.
पंढरीनाथ ढोरे प्रबळ दावेदार
भाजपमधील पंढरीनाथ ढोरे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व अपक्ष यांनी एकत्र येऊन श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी ही घोषणा केली. आघाडीतर्फे पंढरीनाथ ढोरे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, असेही त्यांनी जाहीर केले. रविवारी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. पंढरीनाथ ढोरे यांनी एक महिन्यापूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदाचे भाजपमधील ते प्रबळ दावेदार मानले जात होते. भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत होते. पण पक्षाच्या वतीने भास्करराव म्हाळसकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पंढरीनाथ ढोरे व त्यांचे समर्थक तीव्र नाराज झाले व त्यांनी भाजपपासून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला.