पंतनगर रहिवाशाचे म्हाडाविरोधात आंदोलन

0

मुंबई । घाटकोपर पंतनगर येथील म्हाडा वसाहतीतील समाज मंदिर हॉल म्हाडाने ई निविदा काढून खासगी कंत्राटदाराला वितरित करण्याच्या निर्णयाला पंतनगर म्हाडा वसाहतीतील 315 इमारतीतील स्थानिक रहिवाशांचा विरोध असून समाज मंदिराचा ताबा म्हाडाकडेच ठेवून सर्वसामान्यासाठी समाज मंदिर हॉल नाममात्र किमतीत उपलब्ध करावा अशी येथील रहिवाशांची जोरदार मागणी आहे.

घाटकोपर पंत नगर म्हाडा वसाहतीला हा समाज मंदिर हॉल मागील 15 वर्षांपासून रहिवाशासाठी बंद आहे.हा हॉल पूर्वी विभागातील रहिवाशांना म्हाडाच्या परवानगीने लग्नकार्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाममात्र दरात उपलब्ध होत होता. 15 वर्षांनंतर आता या समाज मंदिर हॉलच्या जागेत टोले जंग टॉवर उभे राहिले आहे. हॉलच्या जागेच्या बदल्यात म्हाडाला उपलब्ध झालेला समाज मंदिर हॉल हासुध्दा म्हाडा टेंडर पद्धतीने खासगी व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव करत आहे, असा येथील रहिवाशांचा स्पष्ट आरोप आहे जानेवारी महिन्यात समाज मंदिर हॉलबाबत एका दैनिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. खासगी कंत्राटदारांच्या हातात समाज मंदिर हॉल जाऊ नये म्हणून पंतनगरमधील रहिवाशी एकत्र आलेले आहेत. त्यासाठी आज रविवारी स्वराज प्रतिष्ठान व स्वराज समाज मंदिर हॉल बचाव समितीच्या वतीने पंतनगर शिवराज चौक येथे म्हाडाविरोधात सह्यांची मोठी मोहीम राबवण्यात आली होती. या सह्या मोहिमेत पंतनगर म्हाडा वसाहतीतील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.