फडणवीस सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक : राजू शेट्टी

0

पुणे । राज्यात फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरी शेतकर्‍यांना त्यांच्या पिकासाठी योग्य हमीभाव मिळाला नाही. ही शेतकर्‍यांची फसवणूक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यात्रेची सुरुवात सोमवारी पुण्यातील महात्मा फुले स्मारकाजवळून झाली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांची यात्रेकडे दुर्लक्ष
ही आत्मक्लेश यात्रा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाणार असून 30 मे रोजी मुंबईत पोहोचून राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी निवेदन देणार आहे. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. सातबारा कोरा करण्यासोबतच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. आत्मक्लेष यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती असूनही त्यांनी संपर्क साधला नाही. यातून राज्य सरकारची मानसिकता दिसते, अशा शब्दांत त्यानी फडणवीसांवर तोफ डागली.

…म्हणून काढली आत्मक्लेष यात्रा
शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य हमी भावाचा निर्णय घेताना मी सुध्दा त्यात सहभागी होतो. शेतकर्‍यांच्या फसवणुकीत माझाही वाटा आहे. म्हणून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी आत्मक्लेष यात्रा काढली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत वाट भरकटले
फुले वाड्यातून या यात्रेला सुरुवात झाली. पण कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नव्हते. दीर्घ काळाच्या प्रवासात जर काही वाटसरु भरकटत असतील, तर त्यांच्यासाठी विचार न करता पुढे जाणे हेच शहाणपण आहे, असे म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांना शेतकर्‍यांचा विसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधानांना शेतकर्‍यांचा विसर पडला आहे, असे सांगत राजू शेट्टींनी मोदींवर निशाणा साधला. शेतकर्‍यांच्या शेतमालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आजपर्यंत या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचा निर्णय पंतप्रधानानी घेतला नसून त्यांनी आम्हाला फसवले आहे, अशा शब्दांत शेट्टी यांनी पंतप्रधानावर टीका केली.