पंतप्रधान आवास योजनेच्या चर्‍होली प्रकल्पास मंजुरी

0

150 कोटी रुपयांचा प्रकल्प, एक हजार 441 सदनिका

पिंपरी-चिंचवड : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चर्‍होली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी एक हजार 441 सदनिका बांधण्यात येणार आहेत. 150 कोटी रुपयांच्या या गृहप्रकल्पाच्या ’डीपीआर’ला राज्य शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 20) मंजुरी दिली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतची माहिती दिली.

‘डीपीआर’ला म्हाडाची मंजुरी
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घर मिळावे, याकरिता केंद्र, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान आवास योजना प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत चर्‍होली येथील 2.15 हेक्टर जागेवर पहिल्या टप्प्यात एक हजार 441 सदनिकांचा घरकूल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाकडे सादर करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी डीपीआरची छाननी केली. तसेच 150 कोटींच्या डीपीआरला बुधवारी मंजुरी दिली. या योजनेंतर्गत प्रत्येक घरासाठी केंद्र सरकारचे दीड लाख तर राज्य सरकारचे एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित पाच लाख 77 हजार रुपये हिस्सा लाभार्थींचा राहणार आहे.

एक लाख नागरिकांनी केले अर्ज
नागरी भागासाठी पंतप्रधान आवास योजनेतून चर्‍होली, डुडुळगाव, रावेत, दिघी, मोशी, वडमुखवाडी, चिखली, पिंपरी आणि आकुर्डी अशा 10 ठिकाणी घरकूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी होणार्‍या प्रकल्पांमध्ये घर घेण्यासाठी महापालिकेने 17 एप्रिल ते 31 मे या दीड महिन्याच्या कालावधीत अर्ज मागविले होते. या कालावधीत शहरातील सुमारे एक लाख नागरिकांनी घरासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर शहरातील 72 स्वयंघोषित व घोषित झोपडपट्टीधारक नागरिकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांनाही घरे दिली जाणार आहेत.