गॅस कनेक्शनच्या रकमेची ग्राहकांकडून वसुली : सबसीडी मिळण्यासही ‘खो’ : चार हजार लाभार्थींची अवहेलना
रावेर (शालिक महाजन)- पंतप्रधान उज्वला मोफत गॅस कनेक्शन योजनेत गरीब कुटुंबांची थट्टा होत असून शासनाकडून मोफत गॅस कनेक्शन तर मिळतेय परंतु त्यांना गॅस हंडीवरील सबसीडी मिळत नाही. शासन गॅस कनेक्शनची रक्कम बाजार भावाप्रमाणे संबधीत ग्राहकांकडून वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. दारीद्य्र रेषेखालील महिलांना धुरापासून मुक्ती मिळण्यासाठी पंतप्रधान उज्वला योजनेची घोषणा करण्यात आली होती परंतु कनेक्शनचा नाहक दिखावा असून लाभार्थींकडून बाजार भावाप्रमाणे असलेली गॅस कनेक्शनची रक्कम सिलेंडरच्या सबसीडीमधून वसूल केली जात आहे.
सबसीडीमधून वसूल केली जाते बाजार भावाची रक्कम
पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ अंत्योदय, बीपीएल, एस.सी.एस.टी. प्रवर्गातील लाभार्थींना केवळ शंभर रुपयात गॅस कनेक्शन दिले जाते व पहिल्या सहा सिलेंडरची सबसीडी संबधीताच्या बँक खात्यावर जमा केली जाते परंतु त्या नंतर ती सबसीडी बंद करून बाजार भावाची रक्कम एक हजार 800 रुपये लाभार्थीच्या सबसीडीमधून वसूल केली जात आहे यामुळे गरीब महिलांमधून या योजनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
असा आहे बाजार भाव रेट
सर्वसाधारण व्यक्ती एजन्सीतून गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेले तर त्यांना बाजार भावाप्रमाणे एक हजार 800 रुपये बाजार भावाप्रमाणे खरेदी करतात व त्यांना गॅस सिलेंडरची पूर्ण सबसीडी त्यांच्या खात्यावर दिली जाते. समजा 702 रूपयाचे सिलिंडर असलेतर त्यांना 205 रुपये सबसीडी दिली जाते.
चार हजार कुटुबांना दिले कनेक्शन
रावेर परीसरात सुमारे चार हजार कुटुंबांना पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन योजनेंतर्गत कनेक्शन देऊन धुर मुक्त करण्यात आले असलेतरी त्यांना एक हजार 800 रूपयांची सुध्दा सबसीडी द्यावी, अशी मागणी गरीब महिला करीत आहेत.