पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही आमचे शत्रू आहात

0

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोळे उघडे ठेऊन मुस्लिम समाजाच्या प्रश्‍नांकडे पहावे. मेंदूवरील जळमटे काढून टाकावीत. तुम्ही मुस्लीम जनतेचे दुःख समजून घेणारे नेते नाहीत. तुम्ही आमचे शत्रू आहात आणि आमच्यासोबत अन्याय कसा होईल याची तयारी करीत आहात, अशा शब्दांत एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकवरुन पंतप्रधानांसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ते पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

शरियतच्या बाजूने उभे राहा
या कार्यक्रमापूर्वी केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुण्यातील मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचा भाषणात उल्लेख करीत ओवेसी म्हणाले, आमच्या आई आणि बहिणींनी तिहेरी तलाक विरोधातील मोर्चात सहभाग घेऊन अन्यायी सरकारला इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुस्लिम तरुणांना आणि ज्येष्ठांदेखील त्यांनी शरियतच्या बाजूने उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

देशातील इंच् इंच जमिनीवर प्रेम
ओवेसी म्हणाले, काँग्रेसने अर्धा हिंदुत्ववाद सोडावा छोटा मोदी होऊ नये. दरम्यान, अयोध्या प्रश्‍नावर सिरियाचा उल्लेख करणार्‍या अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सिरिया सोडूनच द्या, या देशातील इंच् इंच जमिनीवर आमचे प्रेम आहे. भारताला सिरिया बनवू पाहणार्‍यांनी 25 जन्म जरी घेतले तरी भारत सिरिया होणार नाही, कारण भारताची मुळे हीच मुळात लोकशाहीची आहेत. त्यामुळे सिरियाचे उदाहरण देत जे लोकांना भिती घालत आहेत त्यांना या देशाशी प्रेम नाही. तसेच जो घाबरत आहे, तो भारतीय नाही, अशा शब्दांत ओवेसी यांनी श्री श्री यांच्यावर टीका केली.

नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी
मुस्लिमांवर टीका करणार्‍यांना फटकारताना ओवेसी म्हणाले, नथुराम गोडसे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आहे. फाशीवर जाताना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती. पुण्यात शनिवारी तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना ओवेसी यांनी भाजपाचा समाचार घेतला. सरकार सध्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. त्यासाठी सरकारने 2020 सालचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांना शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि बँकांना लुटून फरार होणारे उद्योगपती दिसत नाहीत, अशी टीकाही ओवेसी यांनी केली.