पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन 2022 च्या संकल्पनेतून फैजपूरात महाकृषी शिबिर

0

महाराष्ट्रातील पहिलेच महाकृषी शिबिर ; आमदार हरीभाऊ जावळेंची संकल्पना

फैजपूर- शहरात 1 ऑक्टोंबर रोजी होणार्‍या अटल महाकृषी शिबिर कार्यशाळेची तयारी जोमाने सुरू असून आतापर्यंत 950 शेतकर्‍यांनी या शिबिरासाठी नोंदणी केली असून दोन दिवसात अपेक्षित 1500 ते 2000 शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण होईल, अशी माहिती बुधवारी आयोजित पत्रकार परीषेदेत या शिबिराचे प्रमुख आमदार हरीभाऊ जावळे यांनी दिली. शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार्‍या विविध शेती तज्ज्ञाचा पाच परीसंवादाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे शिबिर जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबरशेठ नारखेडे सभागृहात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होणार्‍या व्हिजन 2022 या कमी खर्चात शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या योजनेतील महाराष्ट्रातीलही शेतकर्‍यांची पहिलीच कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार करणार असून अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असणार आहेत. याप्रसंगी कृषी महोत्सवाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, स्मरणिकेचे प्रकाशन माजी मंत्री एकनाथराव खडसे व जैन एरीगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल. जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी.पाटील यांच्यासह विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी खासदार व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

शिबिराची रूपरेषा अशी असेल
सकाळी 11 वाजता उद्घाटन होईल तर या आधी नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांसाठी सकाळी 8.30 ते 10 पर्यंत नोंदणी 10 ते 10.45 ला पहिला परीसंवाद होईल. त्यात ‘शेतकरी उत्पादक कंपनी, स्थापना कार्य प्रणाली व पुढील संधी’ वक्ते सह्याद्री अ‍ॅग्रोचे संचालक मंगेश भास्कर, दुपारी 2 ते 2.40 या वेळेत ‘कृषी अर्थशास्त्र व प्रक्रियेची संधी’ वक्ते अतुल मांडलीकर 2.40 ते 3.15 ‘कापूस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व प्रक्रियेची संधी’ वक्ते माधव धांदे, 3.20 त े3.45 दुग्धजन्य पदार्थ व कृषी पूरक पदार्थ वक्ते धीरज कणखरे, 4 ते 5 यावेळेत गुणवत्तापूर्वक केळी उत्पादन व निर्यातीच्या संधी जैन इरीगेशनचे डॉ.के.बी.पाटील, त्यानंतर शिबिराचा समारोप होईल.

कृषी स्टॉलच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची माहिती
या शिबिरात एकूण 30 कृषी प्रदर्शनाचे स्टॉल असतील. त्यातून अत्याधुनिक शेती साठीचे तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली जाईल हे शिबिर सुमन माधव फाऊंडेशन जैन इरिगेशन व कृषी विद्यापीठ यांच्या आयोजनाखाली होणार आहे. दरम्यान, पत्रकार परीषदेत मसाका चेअरमन शरद महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी सभापती हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, विलास चौधरी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी गौरक्षनाथ लोखंडे यास कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.