नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिलेलं चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे. ‘विराट तुझे आव्हान मी स्वीकारले, लवकरच याबाबतचा व्हिडीओ मी शेअर करेन’, असे ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी आव्हान स्वीकारल्याची माहिती दिली.
Challenge accepted, Virat! I will be sharing my own #FitnessChallenge video soon. @imVkohli #HumFitTohIndiaFit https://t.co/qdc1JabCYb
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2018
मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचे आव्हान
यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केले होते. फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा स्वतःचा एक व्हिडीओ राठोड यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केले होते. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. त्यानंतर कोहलीने हे चॅलेंज स्वीकारुन पूर्ण केले आणि , ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारले आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असे ट्विट केले. यासोबतच त्याने स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओही शेअर केला होता.