पंधरा दिवसात करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करणे अनिवार्य

0

नोंदणी न केल्यास जबरीदंडासह पाडापाडीची कारवाई करणार

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा इशारा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली नाही. अशा मालमत्ताधारकांनी येत्या १५ दिवसात करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करावी. अन्यथा जबरीदंडासह पाडापाडीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. नजीकच्या करसंकलन कार्यालयात नोंदणीसाठी लेखी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

१५ दिवसानंतर महापालिका मिळकतींचे सर्वेक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. परंतु, शास्तीकरामुळे अनेक नागरिक कराचा भरणा करत नाहीत. तसेच शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी केली नाही. महापालिकेचा कर बुडविला जातो. त्यापार्श्‍वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकृत, अनधिकृत अशा ज्या मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली नाही. अशा मालमत्ताधारकांनी करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

अर्धवट नोंदी केल्या आहेत
पत्रकारांशी बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारक आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी करत नाहीत. कर बुडवेगिरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी महापालिका शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार आहे. तत्पुर्वी, अनधिकृत, अधिकृत अशा ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची नोंदणी केली नाही. त्या मालमत्ताधारकांनी येत्या पंधरा दिवसात महापालिकेच्या नजीकच्या करसंकलन कार्यालयाकडे नोंदणीसाठी लेखी अर्ज करावा. महापालिका मालमत्तेची नोंदणी करुन घेईल. अनेक मालमत्ताधारकांनी मालमत्तेची पुर्णपणे नोंद केली नाही. अनेकांनी अर्धवट नोंदी केल्या आहेत. चार मजली इमारत असेल तर एकाच मजली इमारतीची नोंदणी केली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर मालमत्तेचा व्यावसायासाठी वापर करत असताना त्याची रहिवाशी मालमत्ता अशी खोटी नोंद केली आहे. त्यामुळे पंधरा दिवसात मालमत्तेची करात नोंद करुन घ्यावी. अन्यथा कारवाई केली जाईल. अनधिकृत मालमत्ता असली तर त्यांना महापालिकेच्या सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे अनधिकृत मालत्तेची देखील नोंदणी करणे बंधनकारक आहे.

थकबाकीदारांना नोटीसा
दरवर्षीपेक्षा यंदा मिळकत कर जास्त वसूल केला जाणार आहे. मिळकत कर वसुलीचे उदिष्ट पुर्ण करण्यात येईल. थकबाकीदारांना नोटीसा देण्याची कारवाई सुरु केली आहे. बड्या थकबाकीदारांची देखील गय केली जाणार नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणे देखील तत्काळ मार्गी लावली जातील. त्यासाठी वकिलांसोबत बैठक झाली आहे. प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्याची सूचना वकिलांना केली आहे. अनेक प्रकरणे मार्गी लागली असून त्यांच्याकडून कर वसूल केला असल्याचेही, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.