जळगाव : शेतीच्या मृत्यू पत्रान्वये बाजूने निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्या चोपडा नायब तहसीलदारास लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे (46, रा.आदर्श नगर, विश्वकर्मा सोसायटीजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
लाच भोवली : नायब तहसीलदार जाळ्यात
चोपडा तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती असून त्यांचे वडील मयत झाल्याने शेती मृत्यूप्रमाण पत्रान्वये तक्रारदार यांच्या नावे करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता तर या अर्जावर त्यांच्या लहान भावाच्या पत्नीने हरकत घेतली होती. हरकतीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजुने देण्याच्या मोबदल्यात 4 फेब्रुवारी रोजी आरोपी पंज यांनी तक्रारदाराकडे 15 हजारांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवार, 5 रोजी सायंकाळी आरोपीने तहसील कार्यालयाच्या आवारात लाच घेताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसआय रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.