नवी सांगवी (प्रतिनिधी) – येथील कलाश्री संगीत मंडळाच्या 21 व्या कलाश्री संगीत महोत्सवाच्या तिसर्या दिवशी यंदाचा कलाश्री पुरस्कार देऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. प्रभाकर भंडारे यांना नगरसेविका माई ढोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच यावर्षीचा स्व.शकुंतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कलाश्री युवा कलाकार पुरस्कार सरोदवादक सारंग कुलकर्णी यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवानराव वाल्हेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
* कलापिनी कोमकली यांचे गायन
प्रथम सत्रात शाश्वती चव्हाण हिचे गायन झाले. तिने राग मुलतानीमध्ये विलंबित एकतालात आली री शाम तर द्रुत त्रितालात तुम बिन मानत नहीं जिया मोरा या बंदिशी अतिशय सुरेल आणि तयारीने सादर केल्या. संगीत महोत्सवाची सांगता पंडिता कलापिनी कोमकली यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग केदारमध्ये जोगी जागो रे ही विलंबित एकतालात तर जो दिया सूनहरी ही द्रुत तीनतालमध्ये अतिशय लिलया सादर केल्या. त्यानंतर त्यांनी एक तराना व एक भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.
याप्रसंगी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, मनोहर ढोरे, आरती राव, संजय जगताप, सुलभा गुळवे, ह.भ.प. तुकाराम, ह.भ.प.सुभाष ढोरे, मंगेश वाघमारे, गजानन वाव्हळ, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, नंदकिशोर ढोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.नामदेव तळपे व प्राची पांचाळ यांनी केले.