शास्त्रीय गायक गणोरकर, सतारवादक खाँ बंधूंनी दिवस गाजवला
नवी सांगवी : कलाश्री संगीत मंडळातर्फे ‘भारतरत्न पं. भिमसेन जोशी संगीत महोत्सवा’चा प्रारंभ यंदाही दिमाखदार झाला. सुरुवातीला राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन झाले. येथील पंडित भीमसेन जोशी रंगमंदिर मध्ये आयोजित कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, पं.सुधाकर चव्हाण, विवेक जोशी, नंदकिशोर ढोरे, धनंजय गोखले,.बबन कुंभार, चंद्रा राम्मय्या व संदीप गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
अभंगावर रसिक डोलले
महोत्सवाचे पाहिले पुष्प प्रमोद गणोरकर यांनी गुंफले. त्यांनी मुलतानी या रागामध्ये गोकुल जावें हा ख्याल सादर केला आणि आंगण में नंदलाल हा एकतालामधील छोटा ख्याल अतिशय सुरेलरित्या प्रेक्षकांसमोर सादर केला. त्यानंतर त्यांनी ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर देवेंद्र देशपांडे,तबला साथसंगत अतुल कांबळे, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार ,टाळासाठी दिगंबर शेडुळे तसेच तानपुर्यासाठी दिपक गलांडे व सत्यवान पाटोळे यांनी साथसंगत केली.
सतारीची बहारदार जुगलबंदी
त्यानंतर जागतिक किर्तीचे सतार वादक उ.रफीक खॉ व उ.शफीक खॉ यांनी सतार जुगलबंदी अतिशय बहारदारपणे सादर केली. त्यांनी राग हेमंत मध्ये आलाप, जोड,झाला सादर केल्यानंतर अतिशय उत्कृष्टरीत्या रुपक व द्रुत तिनतालामध्ये गत सादर केल्या. त्यानंर त्यांनी मिश्र शिवरंजनी सादर करुन वादनाचा शेवट केला त्यांना तबला साथ अतुल कांबळे यांनी केली.
पणशीकरांची ‘तुम बिन कौन सवारें’ बंदिश
कार्यक्रमाचे तिसरे पुष्प सादर करताना पं.रघुनंदन पणशीकर यांनी राग मालकंस मध्ये विलंबित तिनतालात तुम बिन कौन सवारें बंदिश अतिशय बहारदारपणे सादर केली. त्यानंतर त्यांनी बाजें मुरली याँ या अभंगाने कार्यक्रमाच्या मैफिलीत रंग भरून कार्यक्रमाची उंची वाढविली. त्यांना हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी , तबला साथसंगत निलेश रनदिवे यांनी केली.तसेच त्यांना स्वरसाथ व तानपुरा साथ शुभम खंडाळकर, अश्विनी पुरोहित व सौरभ काडगांवकर यांनी केली.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सांगता कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तराणा गायनाने झाली. त्यांना राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तबल्यावर सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.नामदेव तळपे यांनी केले.