धायरी : किराणा घराण्याचे गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दोन दिवसीय कलानुभव संगीत महोत्सवात ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते गायिका देवकी पंडित यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सचिन इटकर, पं. कैवल्यकुमार गुरव, भारती बर्हाटे उपस्थित होते.
पुरस्कार वितरणापूर्वी झालेल्या मैफलीत देवकी पंडित यांनी राग भीमपलासने गायनाला सुरुवात केली. विलंबित त्रितालमधील बंदिशी नंतर ‘रेहेज रेहेज गर डालुंगी हरवा’ ही अर्ध्या त्रितालातील पं. बबनराव हळदणकर यांची बंदिश गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘मै तो सावरे रंगराज’ या भजनाने त्यांनी समारोप केला. त्यांना तबल्याची साथ प्रशांत पांडव, हार्मोनियमची साथ सुयोग कुंडलकर आणि गौरी बोधनकर यांनी तानपुर्याची संगत केली.
महोत्सवाची सांगता पं. कैवल्यकुमार यांच्या गायनाने झाली. राग शुद्धकल्याण गाऊन त्यांनी रसिकांचे मन तृप्त केले. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), आदित्य जोशी व चारुदत्त दामले (तानपुरा) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी निवेदन केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नवोदित गायिका आरती ठाकूर -कुंडलकर यांचे गायन झाले. त्यांनी सादर केलेल्या बंदिशीला उपस्थितांनी दाद दिली. पं. उल्हास कशाळकर यांच्या हस्ते आरती कुंडलकर यांना ’पं. संगमेश्वर गुरव युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. कशाळकर यांचे गायन झाले.