भोर । भाटघर धरण जलाशय भागातील बसरापूर गावच्या विकासकामांत राष्ट्रवादीचा मोठा वाटा असून, या गावच्या विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेने कधीच आखडता हात घेतला नाही. भविष्यातही पक्षभेद न करता विकासकामे केली जातील, असे अश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती रणजीत शिवतरे यांनी दिले. बसरापूर गावच्या सुमारे 27 लाख 50 हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे भोर तालुका अध्यक्ष आणि माजी आदर्श जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. लहूनाना शेलार, सूर्यकांत ऊर्फ सुरेश बदक, शारदा झांजले, शशिकांत जगदाळे, भीमाजी दानवले, विष्णू बोडके, रामदास भोंडवे आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यांसाठी 5 लाख खर्च
मागील पंचवार्षिकमध्ये बसरापूर गावात 6 लाख 50 रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना, 4 लाखांचे शाळा वॉल कंपाऊंड, 6 लाख स्मशान भूमी, रस्त्यासाठी 5 लाख, 6 लाख रुपये अंगणवाडीच्या इमारतीसाठी अशी एकूण 27 लाखांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. या विकासकामांचे उद्घाटन भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सरपंच सूर्यकांत तथा सुरेश बदक यांनी मानले.
विकास साधण्यासाठी प्रयत्नशील
बसरापूर गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहेत. गावचा एकोपा जपणार्या या गावच्या विकासकामांमध्ये राष्ट्रवादी कोणताही पक्षभेद करणार नाही. भविष्यात असाच विकास साधण्याचा प्रयत्न करेल. विकास करणार्या राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ग्रामस्थांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
– चंद्रकांत बाठे, अध्यक्ष, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस