मुंबई – -नगरपालिका, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष सदस्यांवर पक्षांतर बंदी कायद्याखाली होणारी कारवाई विफल ठरवणारी कायदा दुरुस्ती भाजपा प्रणित सरकार राजकीय हेतूनेच आणत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी मतविभागणीची मागणी आज विधानसभेत करून सत्ताधारी युतीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण हे विधेयक ८७ विरुद्ध ३४ मतांनी मंजूर झाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हे विधेयक योग्य विचारविनिमय करूनच विधानसभेपुढे आणल्याचे चर्चेला उत्तर देताना सांगितले .
तत्पूर्वी विधेयकावर बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याव्दारे विरोधी पक्षांना नामोहरण करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता विधेयकावर बोलताना शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने तीन महिन्यापुर्वीच केलेल्या कायद्यात पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नवीन कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यांना तीस दिवसाच्या आत सरकारकडे अपील करणे बंधनकारक असणार आहे. सरकारमधील मंत्र्याकडे निर्णय अधिकाऱ येणार असल्याने त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तसेच एखाद्या सदस्यावर स्वपक्षाला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. हे विधेयक आणून सरकारने खालील निर्णय अधिकारी असणाऱे जिल्हाधिकारी व आयुक्तांवर एकप्रकारचा अविश्वास दाखविला आहे. जसे सरकारने अपिलासाठी ३० दिवसांचे बंधन घातले आहे तसेच सरकारही ३० दिवसात यावर निर्णय देईल का ? अशी विचारणा शशिकांत शिंदे यांनी केली.
यावेळी बोलताना आ.भास्कर जाधव म्हणाले पक्षांतर बंदी कायद्यात बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. आणि या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एखादे अपिल फेटाळल्यानंतर हायकोर्टाकडे दाद मागावे लागते, परंतु या कायद्यात राज्याला हस्तक्षेप करता येत नाही याचा विचार हे विधेयक आणताना सरकारने केला आहे काय अशी विचारणा जाधव यांनी केली.
पवार व बापटांची वजाबाकी
विरोधकांनी योग्य वेळी “पोल, पोल” असे ओरडत या विधेयकावर मतदान घेण्याची मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. त्यांनी ती मान्य करताच मतविभागणीची प्रक्रिया सुरु झाली. पाच मिनिटे पर्यंत घंटानाद होत होता. त्या नंतर सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. नंतर कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या पासून सत्ताधारी बाजूच्या सदस्यांची मोजणी सुरु झाली. सर्व मंत्री व भाजपा शिवसेनेचे सदस्य उभे राहून आकडे मोजत होतो. या मतदानात विधानपरिषदेचे सदस्य असणारे महादेव जानकर तसेच रणजीत पाटील नियमानुसार सहभागी झाले नाहीत. सत्ताधारी सदस्यांच्या उपस्थितीचा ८७ हा आकडा स्पष्ट होताच अजीतदादा पवार मोठ्यांदा म्हणाले आता यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून तिकडे गेलेल्यांची संख्या वजा करा त्यांवर सभागृहात हास्यस्फोट झाला. जेव्हा विरोधी बाजूच्या सदस्यांची मोजणी ३४ इतकी भरली तेंव्हा गिरीश बापटांनी पवारांच्या शेऱ्याची परतफेड केली. बापट म्हणाले की दादा आता तिकडून भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांची वजाबाकी करा!!