पक्षी निरीक्षणद्वारे डॉ. सालिम अली यांना आदरांजली

0

पिंपरी चिंचवड : पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त अलाईव्ह संस्थेकडून पवना नदीकाठावर गावडे घाट, चिचंवडगाव परिसरात ‘डॉ. सालिम अली पक्षी निरिक्षण दिन’ साजरा करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आबाल-वुद्ध 30 हौशी पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते.

पक्ष्यांसाठी अवघं आयुष्य अर्पण..

डॉ. सलिम अली यांच्या कार्याबाबत उमेश वाघेला यांनी माहिती दिली, ते म्हणाले, ब्रिटिश काळात आपल्या भारतात प्रथमच पक्ष्यांचा व्यवस्थित अभ्यास सुरु झाला. परंतु प्रत्यक्ष पक्ष्यांचा अधिवासात जाऊन त्यांच्या नोंदी घेण्याचे काम डॉ. सालिम अली यांनीच सुरु केले. त्याकाळी वाहन व्यवहार व्यवस्था म्हणून फार तर बैलगाडी किंवा घोडागाडी मिळायची, ती मिळाली तर ठीक, नाही तर मैलो न मैल पायपीट करत जायचे. जंगलात अनेक कीटक, सरपटणारे जीव, हिंस्त्र प्राण्यांच्या अधिवासात जावे लागायचे. अनेक हाल अपेष्टा शोषत सखोल अभ्यास करुन प्रचंड काम करुन ठेवले. जे आजही अनेक अभ्यासकांना उपयोगी पडत आहे. त्यांनी अवघं आयुष्य पक्ष्यांच्या निरिक्षण व संवर्धनासाठी अर्पण केले. त्यांच्या जयंतीदिनी पक्षी निरिक्षण व निसर्गाविषयी जनजागृती करणे हीच योग्य आदरांजली वाटते

निरीक्षकांवेळी 41 पक्षांच्या प्रजातीची नोंद…

या पक्षी निरीक्षकांवेळी एकूण 41 पक्षांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली. नदी सुरई, छोटा खंड्या, रातबगळा, जांभळा बगळा, वारकरी, धोबी, वंचक, लाजरी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी, प्लवा बदक, पाणकावळे, मोठा पाणकावळा अशा पाणपक्ष्यांची नोंद केली. तर नदीकाठच्या झाडींवर नाचण, राखी धनेश, तारवाली भिंगरी, गव्हाणी घुबड, खंड्या, पोपट, जंगल मैना, साळुंकी, ब्राह्मणी मैना अश्या स्थानिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली. तसेच हिवाळ्यात स्थलांतर करून येणारे चक्रवाक, पिवळा धोबी, तुतवार, शेकाट्या परदेशातून येणार्‍या पाहुण्या पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली.