पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मुंडे यांची धडपड!

0

पुणे । आपला पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर इतरांवर काहीतरी आरोप करावेच लागतात. त्यामुळे धनंजय मुंडे आता जे काही विधान करतात त्यातून त्यांची पक्ष जिवंत ठेवण्याची धडपड दिसून येते. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीसाठी दानवे पुण्यात आले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ’या सरकारच्या काळात शेतकर्‍यांपासून ते अधिकार्‍यांपर्यंत सगळेच संपावर जात आहेत. खरेतर या सरकारलाच संपावर पाठवण्याची गरज आहे’ असे विधान केले होते. त्यावर दानवे यांनी उत्तर दिले. सत्तेत नसताना आम्हीही विरोधकांवर आरोप केले. फक्त आरोपच नाही केले तर, पुरावेही सादर केले, त्यामुळेच काहींना तुरुंगात जाऊन बसावे लागले, असे दानवे यांनी पुढे सांगितले.

नारायण राणे नाराज
मंत्रिपदाच्या आश्‍वासनावर भाजमध्ये दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचे कोणत्याही प्रकारचे आश्‍वासन दिले नसून एनडीएच्या विस्ताराप्रसंगी त्यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत दानवे यांनी दिले. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांच्या एका रिक्त जागेसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी त्यांना नाकारत भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राणे नाराज झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

निवडणुकीची तयारी
भाजप पुढील निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दानवे यांनी सांगितले. त्यासाठी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात तितकेच पक्षविस्तारक नेमले आहेत. महाराष्ट्रात 91 हजार बुथ असून एका बुथवर भाजपचे 25 कार्यकर्ते असतील. त्यामुळे 91 हजार बुथपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यकर्त्यांना मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजप कार्यकाळ पूर्ण करणार
लवकरच मध्यवधी निवडणुका होणार, असे शिवसेना या मित्र पक्षाकडून सांगितले जात आहे. या प्रश्‍नावर रावसाहेब दानवे म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभेचा 5 वर्ष कार्यकाळ भाजपा पूर्ण करेल, तसेच मध्यावधी निवडणुकांचा त्यांचा अंदाज असेल, अशा शब्दात शिवसेनेचे हे आरोप त्यांनी फेटाळून लावले. राज्यातील शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीची रक्कम मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या महिन्याअखेरपर्यंत सर्व शेतकरी कर्ज माफीचे लाभार्थी होतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागील महिन्याभरापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि नाना पटोले हे भाजपाविरोधात विधान करीत आहेत. त्यांच्याविषयी पक्ष काय भूमिका घेणार या प्रश्‍नाबाबत ते म्हणाले, की यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या बाबत मी काही बोलणार नाही. तर नाना पटोले यांच्या विधाना बाबत तूर्तास तरी कारवाई नाही. मात्र, त्यांचे बोलणे पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.