भुसावळ शहरातील प्रकार : नगराध्यक्ष रमण भोळेंसह माजी नगरसेवक संतोष बारसेंची शिष्टाई यशस्वी
भुसावळ- सण-उत्सवाचे दिवस असताना खाजगी कंत्राटदाराकडील कर्मचार्यांचा एका महिन्याचा पगार थकवल्याने संतप्त कर्मचार्यांनी शहरातील भारत मेडिकलसमोर तसेच बद्री प्लॉट भागात घंटागाडीतील कचरा रस्त्यावर टाकल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडल्यानंतर पालिका व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आकाश कल्याण फाऊंडेशनचे ठेकेदार संतोष ठाकूर यांची कानटोचणी केली तर माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी कर्मचार्यांच्या प्रश्नाबाबत मध्यस्थी केल्यानंतर लागलीच कर्मचार्यांना पगाराचे वाटप करण्यात आल्यानंतर दुपारनंतर कर्मचार्यांनी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली.
वेतन रखडल्याने कर्मचारी झाले संतप्त
शहरातील कचरा संकलनाचे काम आकाश कल्याण फाऊंडेशन संस्थेने घेतले असून त्यांना पालिकेकडून दोन ते तीन महिन्यांचे बिल दिले गेले नाही. यामुळे या फाऊंडेशनच्या माध्यमातून कचरा संकलन, शौचालय देखभाल व कचरा ट्रॉलीवरील तब्बल 55 कर्मचार्यांचे एका महिन्याचे वेतन रखडले आहे. कचरा संकलन करणार्या वाल्मिकी, मेहतर समाजाचा आगामी महिन्यात उत्सव असल्याने या कर्मचार्यांनी वेतनाची मागणी केली. ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी सकाळी घंटागाडी व सफाई कर्मचार्यांनी उचला उचलून थेट रस्त्यावर फेकून कामबंद आंदोलन केले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील नृसिंह मंदिर, जामनेर रोडवरील एका गल्लीत रस्त्यावर कचरा टाकून कर्मचार्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील इतर सर्व भागांतील कचरा संकलन व घंटागाड्यांतून घर ते घर कचरा संकलन देखील बंद झाले.
माजी नगरसेवक बारसेंची मध्यस्थी यशस्वी
कर्मचार्यांच्या आंदोलनाची माहिती आकाश कल्याण फाऊंडेशनचे संचालक संतोष ठाकूर व प्रकाश झा यांना मिळताच त्यांनी कर्मचार्यांची भेट घेतली. त्यांना जून महिन्याचे रखडलेले वेतन माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या मध्यस्थीने अदा करण्यात आले. तर कर्मचार्यांची दुसरी महत्वाची वेतनवाढीची मागणीही मंजूर करण्यात आली. शहरातील कचरासंकलन कामाला आठ महिने पूर्ण झाले आहे. यापूर्वी ठरल्याप्रमाणे 12 महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्यांना वाढीव वेतन मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. कर्मचार्यांनीही त्यास अनुमती दर्शवली. सकाळी सात वाजेपासून रखडलेले कचरा संकलन व कचरा भरण्याची प्रक्रिया हा सर्व तिढा मिटल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता तब्बल साडेपाच तासांनी सुरळीत करण्यात आली. सफाई कर्मचार्यांनी तब्बल साडेपाच तास काम बंद केल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर कचर्याचे ढिग साचून होते. दुपारनंतर कामांना वेग आला काही भागात साचलेला कचरा उचला गेला, मात्र समस्या बहुतांशी कायम होती. बुधवारी सकाळपासून अतिरिक्त काम करुन कचरा संकलन केले जाणार आहे.