पगार रखडले ; दीपनगरातील खाजगी सुरक्षा रक्षक संपावर

0

अनेक पॉईंटवरील सुरक्षा वार्‍यावर ; पसारा अ‍ॅक्टनुसार सुविधांची मागणी

भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील खाजगी सुरक्षा रक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने व मागण्यांबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुमारे शंभराहून अधिक खाजगी सुरक्षा रक्षकांनी 12 जानेवारीपासून कामबंद आंदोलन करीत संप पुकारून आमरण उपोषण छेडल्याने प्रकल्पातील अनेक पॉईंटवरील सुरक्षा वार्‍यावर आली आहे. या प्रकारामुळे चोरट्यांना आयतेच रान मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. संपाबाबत तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांचे पगार रखडले
सुरक्षा रक्षकांनी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोंबर ते डिसेंबर 2018 महिन्यांचे पगार सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांना देण्यात आलेले नाहीत. सुरक्षा अधिकारी राजेंद्र पवार यांनी 10 पर्यंत पगार देण्याचे आश्‍वासन दिले मात्र ते पाळण्यात न आल्याने कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन करीत आमरण उपोषणाला प्रारंभ केल्याने प्रकल्पातील अनेक पॉईंटवरील सुरक्षा वार्‍यावर आली आहे. कर्मचार्‍यांनी भविष्य निर्वाह निधी लागू करण्यासह ईएसआय लागू करावा, पगार स्लिप देण्यात यावी, डबल ओटी मिळावा यासह पसारा अ‍ॅक्टनुसार सर्व सुविधा मिळण्याची मागणी केली आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर भावेश भालेराव, राजेश बनसोड, सुधीर कणखरे, पंकज भालेराव, उमेश महाजन, सय्यद फिरोज, अस्लम शहा, विठू वाघ, चेतन पाली, फैजान शेख, दीपक माळी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रशिक्षणाविनाच सुरक्षा रक्षकांची भरती ?
सूत्रांच्या माहितीनुसार प्रकल्पात सुरक्षा रक्षकांची भरती करताना त्यांनी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे शिवाय याबाबत प्रमाणपत्राची खातरजमा करून भरती होणे अपेक्षित आहे मात्र अनेकांना थेट सरळ सेवा भरतीप्रमाणे सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचीही चर्चा आहे. याबाबतही दखल घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.