पटेलांच्या स्मारकासाठी शिवस्मारकाची उंची कमी केली!

0
विधानसभेत विरोधकांचा आरोप, सदस्यांनी वेलमध्ये उतरून केली घोषणाबाजी 
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही चांगलाच गदारोळ झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक सर्वाधिक उंचीचे ठरावे यासाठी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची ३४ मीटरने कमी केल्याचा आरोप करत शुक्रवारी विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्याच्या उंची बाबत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील. त्यावर केलेल्या सूचना मान्य केल्या जातील, असे सांगितल्यावर वातावरण शांत झाले.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची १६० मीटरवरून १२६ मीटरवर आणली आहे. शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल अशी घोषणा सरकारने केली होती. मग आता अचानक उंची कमी करण्याचे कारण काय, सरदार वल्लभभाई पटेल यांचेच स्मारक उंच राहावे यासाठी शिवस्मारकाची उंची कमी केली का, असे सवाल करतानाच सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर, उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सभागृहातील चर्चेदरम्यान उंची कमी केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही १५ वर्षात काय केले, परवानग्याही घेतल्या नाही असे सांगत मुळ प्रश्नाला बगल दिली होती. आता या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समाजासमोर मांडायला हवी, असेही विखे-पाटील म्हणाले.
समुद्री वारेच नव्हे तर वादळांनाही टक्कर देईल अशा स्मारकाचा आराखडा आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता. त्यामुळे समुद्री वादळी वाºयाचे कारण देत शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केला. यावर, शिवस्मारकाबाबत सभागृहात आणि बाहेर विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. यानंतर संतप्त विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सुरूवातील दहा मिनिटांसाठी आणि दुसऱ्यांना अर्धा तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास संपला.
गटनेत्यांनी बैठक घेऊ – मुख्यमंत्री
मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येत असून त्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा जगातील उंच पुतळा असणार आहे. पुतळ्याच्या उंची बाबत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील. त्यावर केलेल्या सूचना मान्य केल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या स्मारकाचा पहिला आराखडा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविला त्यावेळेस 20 टक्के चबुतरा आणि 80 टक्के पुतळा असे स्कीमॅटीक डिजाईन होते. मात्र समुद्रातील वारा आणि अन्य बाबींचा विचार करून सल्लागार संस्थेने 40 टक्के चबुतरा आणि 60 टक्के पुतळा असे डिजाईन तयार केले. हे स्मारक मध्य समुद्रात असल्याने सल्लागार संस्थेने आराखडा अंतिम केला आहे. तरी देखील विरोधी पक्षनेते, गटनेते यांची स्वतंत्र बैठक घेऊन आराखड्यावर चर्चा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.