बारामती । बारामती तालुक्यातील पणदरे येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या ऑल कंम्पाउंडचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यात वापरल्या जाणार्या मातकट वाळू, विटा अत्यंत खराब दर्जाच्या आहेत. विशेष म्हणजे खडीच्या कचेमध्ये हे काम केेले जात असून कामावर पाणी मारले जात नाही. याकडे पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे हे दिसून येत आहे. बांधकाम सुरू असतानाच भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याबाबत गावकर्यांनी तक्रार करूनसुध्दा पंचायत समितीचा बांधकाम विभाग सुस्त आहे. याबद्दल गावकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हे काम थांबविण्याचे ठरविले आहे.
पैशांची उधळपट्टी
दवाखान्याची भिंत मोडकळीस आली असून कदाचित येत्या पावसाळ्यातसुध्दा हे काम कोसळू शकते. म्हणजेच या ठिकाणी वापरला गेलेला पैसा हा सर्वसामान्य नागरीकांचा असून अधिकार्यांनी या पैशाची उधळपट्टी केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असताना नागरीकांनी आता याविषयी आंदोलन करण्याची गरज आहे व ते केले जाईल याबाबत कोणतेही दुमत नाही, असे कोकरे म्हणाले. यामुळे बारामती तालुक्यातील कामाच्या दर्जावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा!
याप्रकरणी पंचायत समितीच्या बांधकाम विभाग तसेच गटविकास अधिकार्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेच दाखल व्हायला पाहिजेत अशी परिस्थिती आहे, असे सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी याबाबत बोलताना सांगितले. अत्यंत खराब दर्जाचे साहित्य वापरले जात असताना अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाही ही धक्कादायक बाब आहे. याचा अर्थ असा आहे की, ठेकेदार व अधिकारी यांच्यात अर्थपूर्ण संबंध किती खोलवर रूजलेले आहेत, याचा अंदाज येत असल्याचे कोकरे यांनी सांगितले.