बारामती । बारामती तालुक्यातील पणदरे ग्रामपंचायतीची सध्या चौकशी सुरू आहे. या ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. या गैरव्यवहाराला वाचा फोडण्यासाठी विक्रम कोकरे यांच्यासह ग्रामस्थांनी तीन दिवसाचे उपोषण केले होते. येथील ग्रामसेवकाला 28 डिसेंबरपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तरीही ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कारभार पाहात आहे. यावर ग्रामस्थांनी लेखी पत्राद्वारेे आक्षेप घेतला आहे. याविषयी बारामतीच्या गटविकास अधिकार्यांकडे रितसर तक्रारही करण्यात आली आहे. ग्रामसेवकाच्या उपस्थितीमुळे चौकशीत बाधा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हास्तरावरून पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी लाखे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लाखे यांनी 28 डिसेंबर 2017 पर्यंत चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे. तपासणी कालावधीत संबंधित कार्यरत ग्रामविकास अधिकारी साळुंखेे यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. असे बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
निधी खर्चाचे प्रमाण कमी
ग्रामविकास अधिकारी संजय बाबासाहेब साळुंखे पाणदरे ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामपंचायत ग्रामनिधीअंतर्गत 3, 10 व 15 टक्क्यांनी दिलेला निधी शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार सन 2010/2011 ते 2016/17 अखेर त्या-त्या आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी खूप कमी निधी खर्च केलेला आहे. त्यामुळे साळुखे यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता बंद करण्यात येत आहे. असा स्पष्ट आदेश गटविकास अधिकार्यांनी पणदरे यांनी ग्रामपंचायतीस दिला आहे. मात्र, एवढे होऊनही ग्रामपंचायतीच्या कारभारात सुधारणा होत असल्याचे दिसून येत नाही, असेच म्हणावे लागेल. कारण गटविकास अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असले तरी ते हजर का राहतात असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
कार्यवाही संथगतीने
15 टक्के मागासवर्गीय निधीमधील अनुषेश रकमेसह मार्च 2018 अखेर 100 टक्के खर्च करण्याबाबत ग्रामपंचायत पणदरे यांना आदेश देण्यात आले आहेत. मागासवर्गीय हरिजन समाजाच्या दहनभूमीबाबत तुकाई मंदीराजवळ निरा बारामती रोडलगत जाणार्या ओढ्याच्या दक्षिणेला संबंधित जागा मालकाच्या सहमतीने ग्रामपंचातीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे. याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करून जागा उपलब्ध करून देऊन सर्वांची सहमती ही घ्यायची आहे. ही कामे ग्रामपंचायतीने करावयाची असून त्याबाबत त्वरीत कार्यवाहीही करावयाची आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावरती याबाबत संथगतीने हालचाल चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.