पणदरे ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी

0

बारामती । बारामती तालुक्यातील पणदरे या गावची ग्रामसभा 30 जानेवारी तसेच 29 जानेवारीला महिला ग्रामसभा झाली. या दोन्ही ग्रामसभांचा फलक ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लिहीला नाही. त्यामुळे हा लोकशाहीचा मोठा अपमान आहे, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम कोकरे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. मुळातच पणदरे ग्रामपंचायतीची सखोल चौकशी सुरू असून या ग्रामपंचायतीचा गैरव्यवहार हा चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळेच ग्रामसेवक व कर्मचार्‍यांनी सूचना फलकावर ग्रामसभेची माहितीच दिलेली नाही. हे अत्यंत गंभीर असून मुजोर अधिकार्‍यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रम कोकरे यांनी 26 जानेेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पणदरे ग्रामपंचायतीची 9 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी केली जाणार असून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन कोकरे यांना यावेळी देण्यात आले होते. या घटनेचे संदर्भ ग्रामसभेत उमटणार, असे गृहीत धरून अधिकार्‍यांनी ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध केली नाही, असा आरोप कोकरे यांनी केला.

दोषींवर कारवाईची मागणी
पणदरे ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची गावात जोरदार चर्चा असून अधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचार्‍यांना गटविकास अधिकारी पाठीशी घालीत आहेत. पणदरे ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून दोषींना निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे मतही कोकरे यांनी व्यक्त केले.