बारामती । पणदरे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी विक्रम कोकरे यांच्यासह ग्रामस्थ बारामती पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणला बसले आहेत. या ग्रामपंचायतीत मोठा गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी 26 मे 2017 रोजी कागदपत्रांच्या पुराव्यासह निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. पंचायत समिती या गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे.
लाखोंची उधळपट्टी
1 ऑक्टोबर 2012 रोजी साठेनगर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्चही दाखविण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात हा रस्ता झालेला नाही. तसेच देवसुया भुयारी गटारही झालेले नाही. अशोकनगरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण खराब झालेले असून यावर साडेचार लाख खर्च करण्यात आले आहेत. तरीही हा रस्ता संपूर्ण उखडलेला आहे. संचितनगर भुयारी गटार योजनेचे काम अर्धवट असून यासाठी सव्वा लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. एकूणच पणदरे ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
शुक्रवारी तिसरा दिवस
उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपांचा अहवाल देणे व खुलासा करणे या दोन्ही बाबी प्रशासनाने टाळलेल्या आहेत असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले.
लेखापरिक्षण अहवाल सादर करा
अहवाल परिक्षणात त्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पंचायतीने प्राप्त अनुदानाचा हेड न बदलता पंचायतीने ज्या कामासाठी अनुदान प्राप्त झाले. त्याच कामावर पंचायतीने अनुदान खर्च केले. याबाबतची सत्यता लेखा परिक्षणास पडताळता आली नाही. प्राप्त अनुदान कोणत्या बाबीचे आहे. याची किर्दवर नोंद न केल्यामुळे अनुदानाची खात्री करता आली नाही. वरील उणीवांची पूर्तता करून लेखापरिक्षणास अनुपालन दर्शवावे, असे स्पष्टपणे लेखापरिक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.