पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत मंत्रालयात कोसळले

0

मुंबई – राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत मंगळवारी सायंकाळी मंत्रालयातील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात चक्कर आल्याने कोसळले. दालनातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर सदाभाऊंवर प्राथमिक उपचार झाले. त्यानंतर सदाभाऊंना विश्रांतीसाठी घरी पाठविले.

मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मंगळवारी मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होती. सदाभाऊ यांना भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या दालनात आले होते. सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. अधिकारी कर्मचारी यांनी प्रसंगवधान दाखवून डॉक्टरांना पाचारण केले.

यापूर्वीही सदाभाऊ यांना दौऱ्यावर असताना चक्कर आली होती. मणक्याचे दुखणे आणि आतड्याशी निगडित आजारांनी त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूर येथील रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पुढील उपचारासाठी ते मुंबईतील खाजगी रूग्णालयात दाखल होते. डॉक्टरांनी सदाभाऊ यांना चक्कर येऊ नये म्हणून एक गोळी सोबत घेण्याचा सल्ला दिला होता. आज दुपारी मंत्रालयात काम करत असताना जेवण उशिरा केल्यामुळे त्यांना चक्कर आली, असे समजते.