बारामती- नागपंचमी सणासाठी पतंग उडविणार्यांची संख्या आजकाल वाढत आहे. मात्र पतंग उडविताना अनेक दुर्घटनाही घडत असतात. विशेषत: पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अशावेळी त्यासाठी पतंगांच्या मागे लागून मुलांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असा सल्ला महावितरणने दिला आहे.
शहरासह ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी लघू व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले आणि तरुण वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण मुले असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातून दुर्घटना घडतात. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग जिवाला धोकादायक असतो. तसेच वीजवाहिन्यांमध्ये पतंग अडकल्यास शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे महावितरणकडून सांगण्यात आले असून वीजतारांवर अडकलेला पतंग काढू नये, वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नये. वीजवाहिन्यांच्या आसपास पतंग उडविला जात नाही ना याकडे पालकांनी लक्ष द्यावे. दगडाला दोरा बांधून तारेवर फेकू नये, पतंग उडविताना मोठी माणसे सोबत असतील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.