पतसंस्थांतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना आता सरकारकडून संरक्षण

0
पं. दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजनेचा 25 सप्टेंबरला शुभारंभ
मुंबई : राज्यात नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबरला लोणावळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले.
देशमुख यांनी सांगितले की, राज्यात सहकारी पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून, आर्थिक विकासात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे ही अनेक वर्षांपासून पतसंस्थांकडून मागणी होती. त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेमुळे राज्यातील आठ हजार 421 पतसंस्थांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पतसंस्था महासंघ अशा दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यात येणार आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महामंडळाकडे दि. 26 सप्टेंबर 2018 पासून अर्ज सादर करता येईल, असे देशमुख यांनी सांगितले.