पतित पावन संघटनेचा बोर्डावर मोर्चा

0

परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव

खडकी : मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी असतानाही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. मुळा नदी पात्रात वाढलेल्या जलपर्णी यामुळे डासांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे खडकीकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासन ढिसाळ कारभारविरूद्ध पतित पावन संघटनेच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष अभय सावंत, सदस्य कमलेश चासकर, दुर्योधन भापकर व अधिकारी बी.एस.नाईक यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. येत्या आठवडाभरात सदर प्रश्‍न व समस्या मार्गी लावली जाईल असे आश्‍वासन या वेळी देण्यात आले.

बोर्डाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, जलपर्णीमुळे खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा सुळसुळाट वाढला आहे. मलेरीया, हिवताप यासारख्या आजारांची साथ निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी संघटनेने अनेक वेळा बोर्ड प्रशासनाकडे तक्रार केली असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कँटोन्मेंट सदस्यही यावर काही बोलत नाहीत. संघटनेचे पुणे शहराध्यक्ष शिवाजी चव्हाण, खडकी विभाग अध्यक्ष शिवाजी पवार, स्वप्नील नाईक, विक्रम मराठे, विजय चव्हाण, महेंद्र टिळेकर, प्रमोद फेंगसे, राजेश काकडे, अनिल दवंडे यासह नागरीक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.