मुंबई- आयकर विभागाचा घरासह कार्यालयावर छापा पकडणार असल्याची भीती दाखवून एका महिलेकडून घेतलेल्या तीन कोटी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी राजेश तुलशीदास नाखुवा नावाच्या एका भामट्याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला काल सायंकाळी येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी त्याला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी राजेशने या महिलेचे तिच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचे सांगून जवळीक निर्माण केली, तीन कोटी रुपयांचे दागिने घेतल्यानंतर कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. तसेच 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. याकामी त्याला दिपक देवजी भानुशाली आणि मिरा ठक्कर ऊर्फ मिरा चंदन या दोघांनी मदत केली आहे. त्यापैकी दिपकला अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे तर मिराचा अटकपूर्व जामिनावर सध्या सुनावणी आहे. तक्रारदार महिलेचा पतीचा व्यावसायिक असून ती तिच्या पती आणि मुलीसोबत राहते. राजेश याची डिटेटिव्ह कंपनी असून याच कंपनीत दिपक आणि मिरा हे दोघेही कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची तक्रारदार महिलेशी ओळख झाली होती.
या ओळखीत त्याने त्यांना त्यांच्या पतीचे कंपनीतील सीए असलेल्या एका तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले होते. या संबंधाचा पुराव्यानिशी अहवाल देण्यासाठी त्याने त्यांच्याकडून चार लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने मंगेश आप्पासाहेब कांबळे याला त्यांच्यावर निगराणीसाठी ठेवले होते. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. मात्र राजेशने त्यांना या संबंधाचे काहीही पुरावे दिले नाही. त्यानंतर त्याने या महिलेस आयकर विभागाचा घरासह कंपनीच्या कार्यालयात छापा पडणार असल्याची भीती दाखवून त्यांचे लॉकरमधून तीन कोटी रुपयांचे दागिने स्वतकडे ठेवले होते. ते दागिने वारंवार मागणी करुनही त्याने परत केले नाही.
पतीच्या कथित संबंधानंतर आयकर विभागाचा छापा अशी खोटी बातमी सांगून राजेश व त्याच्या सहकार्याने फसवणुक केल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट सहाकडे सोपविण्यात आला होता. राजेशचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला मंगळवारी या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. पोलीस तपासात राजेशने या महिलेला पुन्हा दागिन्यांची मागणी केल्यास संपूर्ण कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्या मुलीचे शाळेतून अपहरण करु असे सांगितले होते. असे त्याने काहीही करु नये म्हणून त्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे.