पिंपरी चिंचवड : भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीस तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच तलवार, कोयते घेऊन त्यांच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (दि. 4) दुपारी पवनानगर काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी शांताराम एकनाथ काळुळदे (वय 45, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक नाना शेवरे (वय 20, रा. पवनानगर, काळेवाडी), महेंद्र कोळी, राकेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फिर्यादी शांताराम आणि आरोपी यांची किरकोळ भांडणे झाली. या भांडणाचा जाब फिर्यादीने विचारला. त्यावरून आरोपींनी शांताराम यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपी महेंद्र कोळी याने जीवे मारण्याची धमकी दिली. महेंद्र याने शांताराम यांना डोक्यावर, कानावर आणि पायावर फायटरने मारले, यामध्ये शांताराम जखमी झाले. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या शांताराम यांच्या पत्नीला देखील तोंडावर आणि हातावर मारहाण केली. यानंतर आरोपींनी तलवार आणि कोयते घेऊन शांताराम यांच्या घरातील एलसीडी, फ्रीज, डीव्हीडी, होम थिएटर आणि अन्य सामानाची तोडफोड केली. शांताराम यांच्या अॅक्टिवा मोपेड गाडीचे तलवार, कोयते, दगडाने मारून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.