पत्नीचा खून करुन पतीची रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव । असोदा येथे गुरूवारी 14 रोजी दुपारी आणि रात्री झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर फरार झालेल्या पतीने देखील रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे शुक्रवार दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा येथील धनजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या योगेश गौतम बिर्‍हाडे याच्यासोबत शिरसोली येथील माहेर असलेल्या सिमा योगेश बिर्‍हाडे (वय 25) हिचा चार वर्षापुर्वी विवाह झाला होता. सिमा ही दोन महिन्यांची गर्भवती होती. दारू पिवून वाद घालणे आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून योगेश हा सिमाला नेहमी मारहाण करत असे. गुरूवारी रात्री पती योगेश बिर्‍हाडे याने गळा दाबून खुन केल्याचे उघडकीस आले. दारू पिवून योगेश बिर्‍हाडे हा सिमा बिर्‍हाडे यांच्यासोबत भांडण करत असे.

पती पत्नीत नेहमीचे होत वाद
पती-पत्नीमध्ये नेहमी वाद उद्भवत असत असे सांगण्यात येत आहे. गुरूवारी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात देखील दोघांमध्ये वाद होवून योगेशने पत्नी सिमा हिस मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्री देखील घरात देखील दोघांमध्ये भांडण झाले. खून केल्यानंतर तो जळगावी गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी सिमा हिस रात्री साडेअकराच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रेल्वे ट्रॅकवर योगेशचा मृतदेह
पत्नी सिमा हिला मारल्यानंतर योगेश हा जळगावच्या दिशेने आल्याने ग्रामस्थांनी पाहिले होते. दरम्यान, योगेशने सदर घटनेची माहिती मेहुणे यांना दिली होती. यावेळी त्याचे मेहुणे योगेशला पोलिस स्टेशनला घेवून येत असताना दुचाकीवरून मागच्या मागे उतरून योगेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेट जवळील ट्रॅकवर योगेशचा मृतदेह आढळून आला. घटनेबाबत गावात वेगवेगळ्या तर्क-विर्तक वर्तविले जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.