पत्नीचा शोषण केल्याप्रकरणी जाहिरात दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई – पत्नीचा शोषण केल्याप्रकरणी प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक श्‍वेताब वर्मा यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अद्याप त्यांना अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लवकरच श्‍वेताब यांना चौकशीसाठी बोलावून त्यांची जबानी नोंदवून घेतली जाईल.

नंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. अंधेरीतील वर्सोवा, म्हाडामध्ये श्‍वेताब वर्मा हे त्यांच्या पत्नी प्रिती बंगेरा ऊर्फ प्रिती वर्मा यांच्यासोबत राहतात. चार वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. श्‍वेताब हे प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत अनेक टॉपच्या कलाकरांसोबत जाहिरात केली आहे. काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये प्रचंड वाद होता. याच वादातून त्यांनी प्रितीचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु केला होता. या छळाला कंटाळून प्रितीने अलीकडेच वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन श्‍वेताब वर्माविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 498 कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी लवकरच त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदवून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.