पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेणार्‍या पतीचा पत्नीनेच केला खून : पाचदेवडीतील घटना

पाचदेवडी हादरले : पत्नीच्या चारीत्र्यावर पती सातत्याने संशय घेत असल्याने पत्नीने संतापात केले विळ्याचे वार

Bodwad taluka shaken : Drunken husband killed by his wife with a sickle भुसावळ : पत्नीच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेणार्‍या पतीचा पत्नीनेच विळ्याचे डोक्यावर सपासप वार करीत खून केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील पाचदेवळी गावात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दगडू पुंडलिक सुरवाडे (पाचदेवडी, ता.बोदवड) असे खून झालेल्या पतीचे तर आशा दगडू सुरवाडे असे अटकेतील आरोपी पत्नीचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मयताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चारीत्र्यावर संशय घेतल्याने विळ्याने केले वार
दगडू सुरवाडे हे शेतकरी पत्नी आशा, मुलगी रोशनी (17) सह पाचदेवडी, ता.बोदवड गावात वास्तव्याला होते मात्र सुरवाडे यांना दारूचे व्यसन असल्याने ते पत्नी आशा यांच्या चारीत्र्यावर संशय घेत नेहमीच वाद करीत असल्याने त्यास कुटुंब वैतागले होते. रविवारी सायंकाळीदेखील दगडू सुरवाडे हे शेतातून आल्यानंतर गावात गेले व मद्यप्राशन करून घरी परतले मात्र पुन्हा त्यांनी पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला. त्यानंतर आशा सुरवाडे यांनी घरातील धारदार विळा काढून दगडू सुरवाडे यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. घरातील आरडा-ओरड होत असल्याचे पाहून गल्लीतील नागरीक जमा झाले तसेच मुलगी रोशनीदेखील पोहोचली.

आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक
मुलगी रोशनी हिने आई आशाबाई यांना किचनमध्ये नेत बसवून ठेवले व वरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत आशाबाई सुरवाडे यांना अटक केली. रोशनी यांच्या तक्रारीवरून वडिलांच्या खून केल्याप्रकरणी आई आशाबाई सुरवाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकारी करीत आहेत.