पत्नीच्या प्रियकराचा मित्रांच्या सहाय्याने काढला काटा

0

शिरपूर:आपल्या पत्नीच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करूनही जामीन मिळाल्याचा राग धरून गाई, म्हशींचे दूध काढण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराचा भल्या पहाटेच कुऱ्हाडीने व विळ्याने वार करून          हत्या केल्याची

घटना भामपूर येथे शनिवारी, २३ रोजी घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, विनोद सतीलाल पाटील (वय ३८) असे खून झालेल्या युवकाचे नाव शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर कुंबीपाडा येथे अनैतिक संबंधातून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जुने भामपूर येथे अनैतिक संबंधातून युवकाचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
२३ मे रोजी पहाटे मयत विनोद व त्याचे वडील सतीलाल बाबुराव पाटील (वय ६७) हे गावातील उखडवाडी रस्त्यावरील आपल्या खळ्यात गाई, म्हशींचे दूध काढण्यासाठी जात असतांना ज्ञानेश्वर संभाजी पाटील, बाळासाहेब चंद्रकांत पाटील, भरत दगा पाटील,चंद्रशेखर चंद्रकांत पाटील,कैलास दगा पाटील यांनी संगनमताने मयताच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून लाठ्या-काठ्याने मारहाण करीत विळा,कुऱ्हाड, कोयत्याने मानेवर व गळ्यावर सपासप वार करून जागीच अत्यंत निर्दयीपणे ठार मारले. मयताच्या वडिलासही मारण्याचा प्रयत्न करीत असतांना मारेकऱ्यांच्या हातातून सुटून पळ काढला. आरोपी घटनेनंतर फरार झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय किरण बार्हे, पोना अनिल शिरसाठ, पोकॉ. धनगर,पोना. ललित पाटील, पोकॉ. गवळे, पोकॉ.योगेश कोळी हे घटनास्थळी दाखल झाले होते.घटनास्थळी मयत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मयतास शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्या अंगणापासून संपूर्ण घरात, दरवाज्यावर रक्ताचे डाग दिसून आले.घटनास्थळी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
शिरपूर शहादा रोडवरील जुने भामपूर येथील विनोद सतीलाल पाटील यांचे गावातील ज्ञानेश्वर पाटील यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याप्रकरणी महिलेच्या पतीने वेळोवेळी विनोदला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. एका वर्षांपूर्वी विनोदवर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. परंतु कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याने विनोद घरी परत आला होता. तेव्हापासून संगनमताने विनोदचा काटा काढण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर पाटील व त्याचे मित्र करीत होते, असा आरोप विनोदच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी सतीलाल बाबूराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ३०२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींपैकी पाच आरोपींना पोलिसांनी गावातूनच ताब्यात घेतले तर ज्ञानेश्वर संभाजी पाटील यास शोध पथकाने झोडगे, ता.मालेगाव येथून दुपारी ताब्यात घेतले आहे.