पत्नीला हाकलून देत दुसरा विवाह ; पतीसह 6 जणांवर गुन्हा

0

धुळे। घर बांधण्यासाठी माहेरुन 10 लाख रुपये आणले नाहीत, म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला घरातून हाकलून देत दुसरा विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात पतीसह 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पिंकी उर्फ गायत्री दीपक कडोसे (39) रा. नंदुरबार, ह.मु. अंबिका नगर, धुळे या विवाहितेने चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2013 पासून ते दि.4 जानेवारी 2017 या कालावधीत तिने घर बांधण्यासाठी माहेरुन 10 लाख रुपये आणण्यास नकार दिला. त्यामुळे तिचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शिवीगाळ, मारहाण करुन तिला घरातून हाकलून देण्यात आले. तसेच तिचा पती दीपक जुम्मन कडोसे याने वैशाली मधुकर अहिरे हिच्याशी दुसरा विवाह केला. यावरुन दीपकसह राकेश जुम्मन कडोसे, प्रमिला जुम्मन कडोसे, रमेश कडोसे, शीला रमेश कडोसे, वैशाली अहिरे रा.नंदुरबार, या 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात तक्रार दिल्यामुळे आनंदखेड्यात एकास मारहाण
आनंदखेडे येथील रहिवासी पांडुरंग अहिरे (38) व त्यांच्या आईने नाना भिला वाडेकर, दीपक वाडेकर, मनोज गवते, अरुणाबाई वाडेकर, सुवर्णाबाई वाडेकर सर्व रा.आनंदखेडे यांच्याविरुध्द भिसीच्या पैशांच्या कारणावरुन पोलीस ठाण्यात तक्रार केली. याचे वाईट वाटून वरील 5 जणांनी पांडुरंग अहिरे व त्यांच्या आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली व नाना वाडेकर याने त्याच्या जवळील चाकू सारख्या वस्तूने पांडुरंग अहिरे यांच्या कपाळावर वार करुन जखमी केले. यावेळी वरील संशयितांनी घरात प्रवेश करुन सामानाची नासधूस केली. याप्रकरणी पांडुरंग अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर परस्परविरोधी तक्रारीत दीपक वाडेकर (35) यांनी म्हटले आहे की, दि.2 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आनंदखेडे गावातील सुभाष गवते यांच्या घरासमोर अंगणात बाईला शिवीगाळ का करतात? असे सांगण्याच्या कारणावरुन पांडुरंग अहिरे, देवकाबाई अहिरे, विमलबाई अहिरे या तिघांनी दीपक वाडेकर यांच्या डोक्यात कोयत्याने मारुन डोळ्यात तिखट फेकले तसेच शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावरुन वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला

ठिबकच्या नळ्या चोरीस
तालुक्यातील विश्‍वनाथ गावातील रहिवासी समाधान राजू पाटील, कैलास भटू पाटील, विलास भटू पाटील, गोरख श्रावण पाटील या चौघा शेतकर्‍यांच्या विश्‍वनाथ शिवारातील शेतांमधून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 8 हजार 500 रुपये कीमतीच्या ठिंबक नळ्यांचे 73 बंडल चोरुन नेले. ही घटना दि.1 ते 2 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी समाधान पाटील यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.